Join us

मोहफुलाला आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडे करावी लागते विक्री; आदिवासींचे होतंय आर्थिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:40 IST

निसर्गसौंदर्याने नटलेल्या जव्हार तालुक्यात अनेकविध प्रकारच्या वनस्पती उगवतात. या वनस्पती स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन ठरतात. मोहफुले ही त्यापैकीच एक.

हुसेन मेमन

निसर्गसौंदर्याने नटलेल्या पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यात अनेकविध प्रकारच्या वनस्पती उगवतात. या वनस्पती स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन ठरतात. मोहफुले ही त्यापैकीच एक.

या मोहफुलांचे संकलन करीत, त्यावर प्रक्रिया करणे अधिक सोपे असते. जव्हारमध्ये सध्या मोहफुले बहरली असून, येथील नागरिक त्याचे संकलन करत आहेत, मात्र या भागातील मोहफुलांना आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडे विक्री करावे लागत आहे, परिणामी येथील आदिवासींचे आर्थिक नुकसान होत आहे.

जव्हार तालुक्यातील आदिवासी मोहफुलांच्या मदतीने मद्य तयार करतात. परंतु येथे दारूबंदी असल्याने येथील आदिवासी व बिगर आदिवासी चोरून लपून मोहफुले खासगी व्यापाऱ्यांना विकतात. परिणामी, मजुरांना मोहफुलाला चांगला भाव मिळत नाही.

जुन्या मोहफुलांना अधिक दर

वाळलेले नवीन मोहफूल ४० रुपये किलो दराने ग्रामीण भागात विकले जात आहे. तर जुन्या मोहफुलाला किलोमागे ८० रुपये मिळत आहे. काही व्यापारी वाहनाने जाऊन मोहफूल खरेदी करतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळा दरमिळतो.

मजुरांची होते लूट

ग्रामीण भागातील जंगलातून मोठ्या मेहनतीने मोहफुले संकलित केली जात आहेत. परंतु ही फुले कुठे विकायची, हे माहीत नसल्याने काही व्यापारी मोहफुले घेऊन त्या अत्यल्प मोबदला देत आहेत. त्यामुळे मोहफुलांपासून होणारा फायदा व्यावसायिक घेत आहेत.

मोहफुलांच्या हंगामात अनेक आदिवासींना रोजगार मिळतो. मोहफुलांना योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी हमी केंद्र सुरू होणे आवश्यकच आहे. मोहफुलांवर आधारित प्रक्रिया उद्योगदेखील उभारण्यात यावेत, यासाठी वनमंत्र्यांना भेटणार आहे. - हरिश्चंद्र भोये, आमदार.

जव्हार परिसरात उपलब्ध होणारी मोहफुले संकलन व्हावे, याकरिता आधारभूत खरेदी केंद्र सुरू व्हावेत, अशी मागणी होत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे. - योगेश पाटील, प्रभारी, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ.

हेही वाचा : अमृतफळ आंबा आहे विविध आजारांवर गुणकारी; साल, मोहोर, फळ, पाणे, सर्वांचे आयुर्वेदात महत्त्व

टॅग्स :शेती क्षेत्रपालघरशेतकरीबाजारसरकारशेतीमार्केट यार्ड