Join us

Shubhmangal Yojana : लग्न खर्च टाळा अन् अनुदानही मिळवा; अशी आहे योजना, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 17:19 IST

Shubhmangal Yojana : सामाजिक व न्याय विभागाच्या (Social Welfare) शुभमंगल विवाह सोहळा योजनेमुळे लाखोंचा खर्च टाळता येतो आणि अनुदानही मिळविता येते. 

गोंदिया : मुले-मुली विवाह योग्य झाले की, पालकांना त्यांच्या लग्नाची चिंता सतावते. विवाह समारंभावर लाखोंचा खर्च होत असल्याने पालकांना कर्जबाजारी व्हावे लागते. या खर्चातून मुक्ती देण्यासाठी सामूहिक विवाहाची संकल्पना पुढे आली. सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून पार पडणाऱ्या सोहळ्यातून दाम्पत्यांनाही अनुदान दिले जाते. सामाजिक व न्याय विभागाच्या (Social Welfare) शुभमंगल विवाह सोहळा योजनेमुळे लाखोंचा खर्च टाळता येतो आणि अनुदानही मिळविता येते. 

आर्थिक ऐपत नसताना उधार उसनवारी करून लग्नसमारंभावर उधळपट्टी केली जाते. त्यात नातेवाईक नाराज होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने सामूहिक विवाह मेळाव्यांचे (Samuhik Vivah Sohala) आयोजन केले जाते. जोडप्यांना २० हजार रुपये व विवाह सोहळा आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या नोंदणीकृत सामाजिक संस्थेला चार हजार रुपये दिले जाते. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ टाळता येते. आयुष्यात पैशांची गरज ओळखून पालकांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह मेळाव्यात करणे आर्थिक समृद्धीसाठी फायद्याचेच आहे.

काय आहे शुभमंगल विवाह योजना ?कुटुंबांचा विवाहावर होणारा खर्च कमी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शुभमंगल विवाह योजना राबविण्यात येते. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेणान्या संस्थेसह विवाह करणाऱ्या दाम्पत्याला अनुदान दिले जाते. आतापर्यंत अनेकांनी सामूहिक मेळाव्यात विवाह करून अनुदानाचा लाभ घेतला आहे. 

अटी काय आहेत ?मुला-मुलीचा पहिला विवाह असावा, वय विवाहयोग्य असावे, जातीचा दाखला असावा, आधारकार्ड असावे, पालकांची विवाहाला संमती असावी, आदी प्रमुख अटी आहेत. सामूहिक विवाह सोहळ्यात २० हजार रुपये अनुदान विवाहबद्ध जोडप्याला दिले जाते. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या संख्येत विवाह पार पडले आहेत. त्यांना लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना प्रतिजोडपे चार हजार, तर दाम्पत्याला २० हजार अनुदान दिले जाते. पालकांचा होणारा खर्च कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. उन्हाळ्यात संस्थांनी विवाह सोहळे आयोजित करावे.- विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग,

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीलग्नकृषी योजना