Join us

तुरीच्या गोदावरी वाणाचे बिजोत्पादन; ठिबक सिंचनावर जोमदार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 12:18 PM

पाचशे एकरवर बिजोत्पादनाचा कृषी विभागाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. यात तुरीच्या गोदावरी वाणाची ठिबक सिंचनावर जोमदार वाढ झाली आहे.

कर्जत तालुक्यात तुरीची दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. पाचशे एकरवर बिजोत्पादनाचा कृषी विभागाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. यात तुरीच्या गोदावरी वाणाची ठिबक सिंचनावर जोमदार वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने सगळेच शेतकरी चिंताग्रस्त झाले होते; मात्र नंतर वरुणराजाने सप्टेंबर महिन्यात लावलेल्या दमदार हजेरीने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित होऊन पिकांना मोठे जीवदान मिळाले. कर्जतच्या कृषी विभागाने कृषी विज्ञान केंद्र, दहिगावने, ता. शेवगाव यांच्याकडून तुरीचा अधिक उत्पादन देणारा वाण बीडीएन -१३४१, गोदावरीचे ५०० किलोग्रॅम बियाणे घेतले होते. हे बियाणे ५०० एकरवर कर्जत तालुक्यात त्यातही प्राधान्याने मिरजगाव मंडळातील शेतकऱ्यांनी पेरले आहे.

जवळपास सर्व ५०० शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून या तुरीची लागवड केलेली आहे. या तुरीच्या प्लॉटला वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्र, दहीगावने तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कीटकशास्त्रज्ञ मार्गदर्शन करत आहेत. डॉ. नंदकुमार भुते यांनी शुक्रवारी मिरजगाव येथील शेतकरी बाळासाहेब भोईटे यांच्या गोदावरी वाणाच्या प्लॉटला भेट देऊन कीड व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

गोदावरी हा अधिक उत्पादन देणारा वाण आहे. ते मर रोगास बळी पडत नाही. या वाणाचे बियाणे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी ५०० एकरवरील बियाणे हे सर्व शेतकऱ्यांकडून योग्य शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून बियाणे म्हणून पुढील हंगामात वापरासाठी आणण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. - अमर अडसूळ, मंडळ कृषी अधिकारी, मिरजगाव

टॅग्स :तूरकर्जत-जामखेडशेतकरीपाऊसविद्यापीठपीकरब्बीकृषी विज्ञान केंद्र