Join us

सालगड्यासाठी गावोगावी सुरू आहे शोधा शोध; मजुरांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:53 IST

Salgadi : गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालगाड्यांचा शोध घेत असतात. यासाठी गुढीपाडव्याच्या १५ ते २० दिवस अगोदरपासूनच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सालगड्यांच्या शोधासाठी धावपळ सुरू असते.

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालगाड्यांचा शोध घेत असतात. यासाठी गुढीपाडव्याच्या १५ ते २० दिवस अगोदरपासूनच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सालगड्यांच्या शोधासाठी धावपळ सुरू असते.

परंतु यंदा सालगड्यांचा भाव दीड लाखावर जाऊनही सालगडी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर अनेक शेतकरी नातेवाईकांच्या गावी जाऊन सालगडीचा शोध घेत आहे तर काही दूरध्वनीद्वारे पाव्हणं सालगडी मिळेल का हो? अशी भावनिक साद घालत आहे.  

गुढीपाडवा जवळ आला तरी सालगडी मिळत नसल्याने व त्यांचे पगार गगनाला भिडल्याने त्यातच आजची तरुण पिढी शेती व्यवसायापासून दूर राहत असल्याने आगामी काळात शेती व्यवसाय डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र राज्याच्या विविध ग्रामीण भागात दिसून येत आहे.

शेती मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. गत काही वर्षापासून शेती करणे आव्हानात्मक झाले होते. पाऊस अत्यंत अल्प, नाहीतर बरसला की अति होत आहे. त्यात खरीप व रबी हंगामातील पीक काढणीला आले की अतिवृष्टीने नासाडी होत असल्याचे वास्तव आहे.

मानसिकतेत झाला बदल

• सालगडी म्हणून गुंतून राहण्यापेक्षा अनेक जण बांधकाम, वीटभट्टी, ऊसतोडणी, मंदिर बांधकाम, बार अँड रेस्टॉरंटमध्ये कामगार म्हणून जातात. येथे अधिक कमाई होत असल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर शहराकडे वळाले आहेत.

• त्यामुळे सालगडी मिळणे सध्या शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे.

• सालगडी मिळत नसल्याने शेतकरी आपली शेती बटाईने देण्यावर भर देत आहेत. या वर्षात गुढीपाडवा जवळ आला तरी सालगडी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकरी सालगड्याच्या शोधात भटकत आहेत. 

सालगड्याचा पगार लाखावर

शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी आणि शेतीसाठी करावा लागणार खर्च अधिक, यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. यंदा सालगड्याचा पगार एक लाख ते दीड लाखापर्यंत गेला आहे. वणी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये स्थानिक पातळीवर सालगडी मिळत नसल्याने इतर जिल्ह्यांतून सालगडी शोधून आणण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे.

सालगडी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे त्यात पगार, कामाची वेळ, आगाऊ रक्कम आदींमुळे येणाऱ्या काळात शेती व्यवसाय डोकेदुखी ठरणार आहे. - नवनाथ राऊत, शेतकरी, पुरी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर. 

हेही वाचा : शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहाराष्ट्र