Join us

बांबू शेतीचा सातारा पॅटर्न; शेतकरी होईल का मालामाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:13 PM

सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून ग्रामपंचायत अंतर्गत ४ हजार २२२ शेतकऱ्यांना लागवडीसाठी मंजुरी मिळाली असून ३५३ कामे सुरूही झाली आहेत.

सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून ग्रामपंचायत अंतर्गत ४ हजार २२२ शेतकऱ्यांना लागवडीसाठी मंजुरी मिळाली असून ३५३ कामे सुरूही झाली आहेत.

या लागवडीतून शेतकरी मालामाल होणार आहेत. राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली आहे. या अंतर्गत सातारा आणि लातूर या दोन जिल्ह्यांची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी ६ लाख ९० हजार रुपये अनुदान दिले जात आहे. हे तीन वर्षांसाठी मिळणार आहे. या बांबू लागवडीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे झाड लावल्यानंतर ४० वर्षांपर्यंत उत्पन्न देते. यासाठी पाणीही देण्याची गरज नसते.

तसेच बांबूपासून अनेक वस्तू बनतात. बांबूला चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे बांबू लागवडीतून शेतकरी मालामाल होत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही बांबू लागवड सुरू आहे.

सातारा जिल्ह्याला २५ हजार हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामधील १० हजार हेक्टरचे उद्दिष्ट ग्रामपंचायत विभागाला आहे. तर राज्य कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागाला प्रत्येकी साडेसात हजार हेक्टर उद्दिष्ट दिलेले आहे.

सध्या अनेक भागात बांबू लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यामुळे येत्या काही वर्षांत बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे. याकडे लक्ष लागले आहे.

रोपे देण्यासाठी संस्था..राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपे देण्यासाठी तीन संस्था तयार करण्यात आलेल्या आहेत. या संस्थांकडून शेतकऱ्यांना बांबूची रोपे मिळत आहेत. यासाठी शासनच कंपन्यांना रोपांचे पैसे देणार आहे. नंतर शेतकऱ्याच्या लाभातून पैसे कमी केले जाणार आहेत.

१८६ हेक्टरवर सुरू..• ग्रामपंचायत अंतर्गत २ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीसाठी मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये ४ हजार २२२ शेतकरी लाभार्थी आहेत.• यातील ३५३ शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचे काम सुरू केले आहे. सध्या ग्रामपंचायत विभागाच्या अंतर्गत १८६ हेक्टरवर बांबू लागवड करण्यात येत आहे.

बांबूचा फायदा काय?बांबूपासून विविध वस्तू बनविता येतात. तसेच फर्निचरही तयार केले जाते. तर केंद्र शासनाने कंपन्यांत ७ टक्के बायोमास वापरण्याची सूचना केलेली आहे. त्यामुळे बांबू हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. यातून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. तसेच एकदा बांबूची लागवड केल्यानंतर ४० वर्षे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे.

कोणाला लाभ मिळणार?या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच दिव्यांग आणि महिला शेतकरीही पात्र ठरणार आहेत. या सर्वांना क्षेत्राची अट नाही. मात्र, खुल्या प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा दोन हेक्टरपर्यंत लाभ मिळणार आहे.

अनुदान तीन वर्षे..लागवड पूर्व कामांसाठी - १,७९,२७२ रुपयेप्रथम वर्ष संगोपन - २,१४,६५३ रुपयेद्वितीय वर्ष संगोपन - १,४४,२७४ रुपयेतृतीय वर्ष संगोपन - १,५१,८९० रुपये

टॅग्स :शेतकरीसरकारी योजनासरकारसातारापीक व्यवस्थापनपीकवनविभाग