Join us

राज्यातील भूकरमापकांना सुधारित वेतनश्रेणी लागू; आता पगारात होणार वाढ? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:33 IST

Bhukarmapak Update भूकरमापकांना गेल्या अनेक वर्षापासून इतर विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. यासाठी विविध संघटनांनी वारंवार आंदोलने तसेच बेमुदत संप केले होते.

पुणे: राज्यातील भूमी अभिलेख विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांची दिवाळी गोड होणार असून, त्यांना लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.

याबाबत भूमी अभिलेख संचालक तथा जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.

भूकरमापकांना गेल्या अनेक वर्षापासून इतर विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. यासाठी विविध संघटनांनी वारंवार आंदोलने तसेच बेमुदत संप केले होते.

मात्र, यावर कधीच तोडगा निघाला नाही. जुलै महिन्यात पुणे विभागाच्या महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने बेमुदत संप केला. त्यावेळी दिवसे यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मध्यस्थी केली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला होता.

दिवसे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग, नाशिक विभाग, कोकण प्रदेश, विदर्भ विभाग, छत्रपती संभाजीनगर या विभागातील संघटना तसेच कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली.

या बैठकीला अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे, उपसंचालक राजेंद्र गोळे, उपसंचालक कमलाकर हट्टेकर, महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाचे अध्यक्ष विजय पिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या भूकरमपाक 'एस-६ या वेतनश्रेणीमधून 'एस-८' वेतनश्रेणीमध्ये जाणार आहेत. त्यामुळे सुमारे सध्या बेसिक (एस-६) वेतन १९ हजार आहे. तेच (एस-८) वाढ होऊन २५ हजार २०० (बेसिक) पोहोचणार आहे.

भूमी अभिलेख विभागाचे संचालक तथा जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्याबरोबर राज्यातील सर्व भूकरमापक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सुधारित वेतनश्रेणी आणि आकृतीबंध लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. नवीन वेतनश्रेणी महिनाभरात लागू होणार असल्याबाबत सूतोवाच करण्यात आले. - अजित लांडे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना, पुणे विभाग

अधिक वाचा: सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

टॅग्स :महसूल विभागसरकारराज्य सरकारपुणेदिवाळी २०२५संपचंद्रशेखर बावनकुळेजिल्हाधिकारीआयुक्त