महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हे अभियान ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’, ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक उपक्रम आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करुन ‘नाविन्यपूर्वक उपक्रम’ अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
पाणंद रस्ते विषयक मोहीम◼️ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता मिळावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना आणली जाणार आहे.◼️ या अनुषंगाने सेवा पंधरवडा अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये १७ ते २२ सप्टेंबरच्या कालावधीमध्ये खालील कामे केली जाणार आहेत.◼️ शिव पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण करणे◼️ ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक/वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे◼️ शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे◼️ रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे◼️ शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.◼️ सीमांकनासाठी रस्त्यांच्या किनारी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रत्येक शेताला सुमारे १२ फुटांचे रस्ते उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असल्याची माहिती मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिली.
अधिक वाचा: सप्टेंबर महिन्याच्या 'या' आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता