यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर निर्बंध आले आहेत. याला अनेक बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने थकीत कर्जाचा वेळेपूर्वी भरणा न करणे ही बाब कारणीभूत ठरली आहे.
या थकीत कर्जामुळे नवीन कर्ज वितरणावर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी सावकाराकडे धाव घेतली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये दोन लाख १९ हजार १५० शेतकऱ्यांना दोन हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करायचे होते.
त्याकरिता ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी कर्जाचे वितरण करण्याचे बँकांना आदेश आहेत. मात्र, कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाही.
यातून पेरणी तोंडावर असली, तरी एक लाखावर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. याला जुन्या कर्जाची थकबाकी कारणीभूत ठरली आहे. आता शेतकऱ्यांकडे पैसेच नाही, यामुळे अनेकांना कर्जच भरता आले नाही. या शेतकऱ्यांनी सावकाराकडे धाव घेतली आहे.
जिल्हा बँक आघाडीवर, इतर बँका माघारल्या
जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या ६७ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. मात्र, ११ राष्ट्रीयकृत बँका ४७ टक्के कर्ज वितरणावरच थांबल्या आहेत. व्यापारी बँकांचे कर्ज वाटप, तर २८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांचा मुजोरी कायमच
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून अनेक निकष लावले जातात. जिल्हा प्रशासनासह राज्य शासन वारंवार या बँकांना पीक कर्जाच्या वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश देते. मात्र या बँकांकडून याला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही.
१ लाख १० हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला
दोन लाख १९ हजार पीक कर्ज खातेधारकांपैकी १ लाख १० हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला आहे. मात्र जवळपास तितकेच शेतकरी थकीत कर्जदार बनले आहे.
जिल्ह्यात थकीत शेतकरी किती?
संपूर्ण जिल्ह्यात दोन लाख १९ हजार १५० खातेधारक शेतकरी आहेत. या पैकी एक लाख १० हजार ९१ शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला. तर, एक लाख नऊ हजार शेतकऱ्यांना कर्जाचा भरणाच करता आला नाही. हे थकबाकीदार शेतकरी पेरणी करता यावी, म्हणून कृषी सेवा केंद्र चालक, नातेवाईक आणि गावातील खासगी फायनान्स कंपनी, महिला बचतगटाकडे कर्जासाठी पोहचले आहे.
शेतकऱ्यांपुढे अडचणीचा डोंगर
बँकाचे कर्ज थकले आहे. अशात खासगी सावकाराकडून आणि विविध ठिकाणांवरून कर्जाची उचल त्यांनी केली आहे. या परिस्थितीत पेरणी केल्या नंतर पुढील हंगाम पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी पैशांची आवश्यकता आहे. खत, निंदण, औषधी, मजुराची मजुरी यांसाठी शेतकऱ्यांना पैसे लागणार आहे. इतकेच नव्हे तर घर कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे कायम उभा आहे.
थकीत शेतकऱ्यांमुळे बँकाना कर्जाचे वितरण करता आले नाही. ३१ जुलै ही कर्ज वितरणाची अंतीम तारीख आहे. यानंतरही शेतकरी आले तरी त्यांना कर्ज मिळेल. मात्र शेतकऱ्यांनी कर्ज न भरल्याने गोंधळ झाला आहे. - ज्ञानेश्वर टापरे, अग्रणी बँक व्यवस्थापक, यवतमाळ.
हेही वाचा : UPSC सोडली; शेती केली! आपल्याच शेतातून केळीचा कंटेनर निर्यात करणारा युवा शेतकरी