Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा; आर्द्राचा पाऊस ठरतोय कोवळ्या पिकांसाठी लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 11:21 IST

शेतकऱ्यांना दमदार पावसाची मात्र अध्याप ही प्रतीक्षा: काही भागात पिके आली जमिनीवर

यावर्षी मृगाचा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली असून खरिपाची (Kharif) पेरणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. यावर्षी खरिपाचा पेरा वाढण्याची शक्यता असून, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात खरिपाची पेरणी ७८ हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. ज्यांनी पेरणी केली त्या पिकांसाठी आता आर्द्राचा पाऊस लाभदायक ठरत आहे.

यावर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे व पेरणी ही आटोपत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. यावर्षी हळदीची लागवड व तुरीचा पेरा पाच ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तुरीला हमीभाव बऱ्यापैकी असल्यामुळे तुरीचा पेरा वाढलेला आहे. सोयाबीनला हमीभाव योग्य नसल्यामुळे यावर्षी सोयाबीनचा पेरा पाच टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

यंदा कापसाचे क्षेत्र मागच्या वर्षीच्या एवढेच राहणार आहे. यंदा मृगाने (Rain) दमदार बरसात केल्याने खरीप पेरणीस वेग आला होता. काही भागात पिके जमिनीवर आली असून, सध्या होत असलेला पाऊस लाभदायक ठरत आहे.

सोयाबीनच्या पेर्‍यात घट

आतापर्यंत जवळपास पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीनच्या क्षेत्रात थोडीशी घट झाली आहे. कळमनुरी तालुक्यात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळलेला आहे. यंदा मूग उडीद व तुरीच्या क्षेत्रात काहीशी वाढ आली आहे. सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा हळद व तुरीवर लक्ष केंद्रित केले आहे.

समाधानकारक पावसाची आशा

मागील दोन वर्षांत मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला नाही, त्यामुळे पेरण्या लांबल्या आणि त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडतो तर काही ठिकाणी दिवसभर उघडत जातो. अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

सोयाबीनसाठीच्या खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने यंदा सोयाबीनऐवजी तूर व हळदीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मृग नक्षत्रातच पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी मूग व उडीद याचा पेरा बऱ्यापैकी केलेला आहे.

हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म

टॅग्स :पाऊसपीकशेतकरीशेतीहिंगोलीशेती क्षेत्रखरीप