Join us

Reflector : रिफ्लेक्टर ठरते नवसंजीवनी; ऊस वाहतुक अपघाताला आळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:45 IST

ऊसाचा हंगामास सुरूवात झाली आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता रिफ्लेक्टर बसवल्याने अपघात टाळण्यास मदत होणार आहे. (Reflector)

Reflectorजालना : गळीत हंगाम सुरु झाला आहे. शेत ते ऊस कारखाना अशी वाहनांची ये - जा सुरु असते.  सुरक्षित आणि अपघातमुक्त पार पाडण्यासाठी जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परतूर येथील मा. बागेश्वरी साखर कारखाना व घनसावंगीतील समृद्धी साखर कारखान्यावर सोमवारी (२ डिसेंबर) रोजी विशेष सुरक्षा मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात ऊस वाहतुकीशी संबंधित सुरक्षाविषयक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आणि आवश्यक निर्देश वाहनचालकांना देण्यात आले. कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना ऊस वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाय राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यात आले. वाहनांवर मागील बाजूस लाल रंगाची आणि समोरील बाजूस पांढऱ्या रंगाची रिफ्लेक्टर पट्टी बसविण्याचे निर्देश देण्यात आले.

या पट्टया ऊस किंवा पाचटामुळे झाकल्या जाणार नाहीत, त्याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली. काही वाहनांवर प्रत्यक्ष कार्यालयाकडून रिफ्लेक्टर पट्ट्या लावून या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

याशिवाय सुरक्षित ऊस वाहतुकीसंदर्भातील फ्लेक्स व प्रसिद्धीपत्रके कारखान्याच्या परिसरात लावण्यात आले आणि वाटप करण्यात आले. नादुरुस्त वाहने रस्त्यावर असल्यास ती तत्काळ बाजूला हटवावीत किंवा रात्री ती स्पष्ट दिसतील अशी व्यवस्था करावी, अशी सूचना या वेळी देण्यात आली.

या मार्गदर्शन सत्रांमध्ये कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, सुरक्षारक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. हा उपक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या नेतृत्वाखाली आणि मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे यांच्या मार्गदर्शनात सहायक मोटार वाहन निरीक्षक दीपक जाधव आणि ओंकार कातोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.

ऊस लादताना उंची मर्यादित ठेवा

* वाहनांवर ऊस लादताना उंची मर्यादित ठेवावी, कारण उंची वाढल्यास वाहन उलटण्याचा धोका निर्माण होतो.

* ट्रॅक्टर-ट्रेलरची एकत्रित लांबी १८ मीटरपेक्षा अधिक असू नये.  

* मोठ्या आवाजाचे स्पीकर वाहनांवर लावणे टाळावे, कारण त्यामुळे इतर वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.

* वाहनचालकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहतूक करावी आणि वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवून चालवावे.

टॅग्स :शेती क्षेत्रऊससाखर कारखानेबदलीशेतकरीशेती