Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर फोडून ४ वर्षांत साडेतीन किलोमीटरचा रस्ता केला; वाचा साताऱ्याच्या दशरथ मांझीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:41 IST

कोणत्याही सरकारी मदतीची किंवा मनुष्यबळाची वाट न पाहता, त्यांनी एकट्याने डोंगर फोडून तब्बल साडेतीन किलोमीटरचा रस्ता तयार केला.

सचिन काकडे
सातारा : प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो, याचे जिवंत उदाहरण सातारा तालुक्यातील करंडी गावचे ६७ वर्षीय अशोक तुकाराम जाधव ऊर्फ नाना यांनी जगासमोर ठेवले आहे.

कोणत्याही सरकारी मदतीची किंवा मनुष्यबळाची वाट न पाहता, त्यांनी एकट्याने डोंगर फोडून तब्बल साडेतीन किलोमीटरचा रस्ता तयार केला.

त्यांच्या या अचाट कामगिरीमुळे दुर्गम कड्यावर असलेल्या श्री शिलनाथ मंदिराची पायवाट आता भाविकांसाठी सुरक्षित मार्ग बनली असून, सातारा जिल्ह्याला नवा 'दशरथ मांझी' मिळाला आहे.

नानांचे बालपण याच डोंगराच्या कुशीत गेले. लहानपणी गुरे राखताना किंवा अभ्यास करताना त्यांनी या चिंचोळ्या आणि घसरड्या वाटेवरून होणारा भाविकांचा त्रास पाहिला होता.

हीच सल त्यांच्या मनात होती. याच ओढीतून २०२२ मध्ये त्यांनी दुर्गम वाटेला रस्त्याचे स्वरूप देण्याचा विडा उचलला.

'टायगर' होता सोबती
◼️ नाना डोंगरावर कामाला जायचे, तेव्हा एक भटका कुत्रा त्यांच्यासोबत असायचा. नानांनी त्याचे नाव 'टायगर' ठेवले होते.
◼️ नाना काम करत असताना हा 'टायगर' साहित्याची राखण करायचा.
◼️ या चार वर्षांच्या प्रवासात नानांना चार वेळा प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले, तरीही त्यांनी काम थांबवले नाही.
◼️ दुर्दैवाने, एके दिवशी बिबट्याने 'टायगर'चा फडशा पाडला आणि नानांचा एकनिष्ठ सोबती हिरावला गेला.
◼️ तरीही बिबट्याच्या दहशतीला न जुमानता नानांनी डोंगरातून 'मार्ग' काढला.
◼️ 'मांझी: द माउंटन मॅन' या चित्रपटातील 'दशरथ मांझी' यांच्या कथेप्रमाणेच नानांचा हा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.

भक्तीच्या वाटेत खडकांचे अडथळे नकोत, याच ध्येयाने पहार हाती घेतली. चार वर्षे परिश्रम करून दोन मीटर रुंद, साडेतीन कि.मी लांब रस्ता तयार केला. ग्रामस्थ आनंदाने या रस्त्यावरून चालतात, तेव्हा माझ्या श्रमांचे सार्थक झाले असे वाटते. - अशोक जाधव, करंडी, सातारा

अधिक वाचा: जगातील सर्वांत महागडा जपानमधील मियाझाकी आंबा फुलतोय सांगलीतील 'या' शेतकऱ्याच्या शेतात

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Man Carves 3.5km Road Through Mountain in 4 Years

Web Summary : Ashok Jadhav, 67, from Satara, single-handedly carved a 3.5km road through a mountain to ease access to a temple. Inspired by Dashrath Manjhi, he persevered despite challenges, including losing his dog, Tiger, to a leopard, creating a safer path for devotees.
टॅग्स :सातारा परिसररस्ते वाहतूककुत्राबिबट्याबिबट्याचा हल्लाजंगलसरकार