नाशिक : रोजंदारीवर होणारी शेतीची कामे पुरेसा मोबदला देऊनही विलंब लागत असल्याने रोजंदारीचे दिवस वाढत असल्याने आता शेतकऱ्यांनीदेखील ठेकेदारी पद्धतीने शेतीची कामे देण्याची पद्धत स्वीकारली असल्याचे दिसत आहे.
देवळा तालुक्यातील तीनही हंगामांतील प्रमुख पीक कांदा आहे. परंतु सध्या वाढलेल्या थंडीमुळे कामाच्या वेळात बदल करून कामे जोरात सुरू आहेत. परंतु पूर्वीसारखी रोजंदारी मजुरी पद्धत कमी झाली असून, शेतीची जवळपास सर्वच कामे ठेका पद्धतीने होऊ लागली आहेत. ठेकेदारी पद्धतीने कामे दिल्यास लवकरात लवकर कामे उरकण्यावर भर देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
सध्या लाल कांदा काढणीचे आणि उन्हाळी कांदा लागवड आदी कामे जोरात सुरू आहेत. सुमारे २५० ते ३०० रुपये रोजंदारीचा कामाचा दर आहे. परंतु यात कामांच्या वेळा मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे रोजंदारीची कामे परवडत नसल्याने शेतकरी ठेका पद्धतीने कांदा लागवड, मका कापणी, मका काढणी आदींसह सर्वच कामे देताना दिसत आहेत. यामुळे कामे लवकर होतात. परंतु एकरी १५००० रुपये याप्रमाणे कांदा लागवड किंवा काढणीची कामे ठेकेदार घेतात.
वेळेची बचत होत असल्याचा दावा
रोजंदारीने जे काम आठवड्यात होते, तेच काम ठेका पद्धतीत ३ ते ४ दिवसांत करून मोकळे होतात. यामुळे सध्या सगळीकडे उन्हाळी कांदा लागवड आणि लाल कांदा काढणीचे कामे जोरात सुरू आहेत. कांदा रोपे (उळे) उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
मागील महिन्यात पावसाने रोपे खराब झाल्याने नव्याने उळे तयार करावी लागली. शेतकरी वर्गाचे शेतातील लागवड आणि लागवड केलेल्या कांदा पिकास पाणी देणे याचे नियोजन करावे लागत आहे. वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार सर्व कामांचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते.
