Join us

Rabi seasons : वाढती थंडी रब्बीच्या पिकांना लाभदायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:38 IST

खरीप हंगाम संपून जिल्ह्यात रब्बीचा हंगाम सुरू आहे. पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. (Rabi seasons)

Rabi seasons :

वाशिम : खरीप हंगाम संपून जिल्ह्यात रब्बीचा हंगाम सुरू आहे. ८९ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६७ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या आटोपल्या आहेत.अंदाजे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, इतर क्षेत्रावर पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे.

सोयाबीन काढणीनंतर शेतकऱ्यांची रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली असून, जिल्ह्यातील ७५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे जवळपास २५ टक्के क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट झाली.

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात विक्रीला आलेला असून, अपेक्षित दरापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत अत्यल्प दर मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्प तुडुंब भरले आहेत.

शेतशिवारातील नद्या, ओढे, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे रब्बीच्या हंगामातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची अपेक्षा आहे.जिल्ह्यात रब्बीचे एकूण क्षेत्र ८९ हजार ७८१ आहे. यापैकी ६७ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पिकांला लाभदायक असे हवामानही अनुकूल आहे. त्यामुळे पिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

हरभरा पिकाकडे वाढता कल

जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातच थंडीचा जोर लक्षात घेता अनेकांनी हरभरा पिकाला पसंती दिल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टरवर हरभरा पिकाचा पेरा आहे.

थंडी वाढली, रब्बीच्या पिकांना लाभ

• हळूहळू जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे.

• थंडी रब्बीतील पिकांना लाभदायक ठरते.

• यामुळे कमी पाण्यात आणि थंडीमुळे हरभरा पिकांना फायदेशीर असतो.

• यामुळे वाढलेली थंडी पिकांना लाभदायक ठरेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीशेतकरीशेती