Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rabi Season : कृषी विभागाकडून रब्बीची तयारी सुरू; यंदा 'इतके' हेक्टर वाढणार क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:59 IST

यंदा कृषी विभागाने बियाणांची मागणी लक्षात घेऊन २६ मेट्रिक टन खत झाले उपलब्ध केले आहे. (Rabi Season)

Rabi Season :

बाळासाहेब माने/ धाराशिव :

हातातोंडाशी आलेला खरीप हंगामाचा घास अतिवृष्टीने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकरी पंचनाम्यासह मदतीची वाट बघण्याऐवजी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा रब्बीचा पेरा मागीलवर्षाच्या तुलनेत १ लाख हेक्टरने वाढणार आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीसह हरभऱ्याचा समावेश राहणार आहे. यंदा धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप पाण्यात गेला आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी खरिपाचे दुःख झटकून रब्बी हंगामाच्या कामाला लागला आहे. त्याप्रमाणे कृषी विभागाकडूनही तयारी करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील खताचे आवंटन उपलब्ध झाले आहे.

त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून वाफसा झालेल्या शेतीच्या मशागतीचे काम वेगात सुरू केले आहे. काही भागातील जमिनीमध्ये अद्याप वाफसा झाला नाही.यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात समाधानकारक झाला आहे.

त्यामुळे मागीलवर्षाच्या तुलनेत यंदा रब्बीचा पेरा अधिक होणार आहे. गेल्यावर्षी कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. मात्र, गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने प्रत्यक्षात ३ लाख ७५ हजार हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली होती.

यातील बहुतांश भागातील पीक काढणीपूर्वीच वाळली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते. यंदाच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास अतिवृष्टीने हिरावला आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. तूट भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची पेरणी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

यंदा पाऊस चांगला झाला आहे. यामुळे गेल्यावर्षाच्या तुलनेत जवळपास १ लाख हेक्टरने रब्बीचा पेरा वाढणार आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा, ज्वारी व गहू असणार आहे. खत व बियाणाचे नियोजन केले आहे. काही भागात उसाचे क्षेत्रही वाढणार आहे. -परमेश्वर राठोड, जिल्हा कृषी अधिकारी.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पीक पाण्यात गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाची वेळेत पेरणी करून नुकसान भरून काढण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. शासनाने खरिपाची भरपाई रब्बीच्या पेरणीला द्यावी. - सुरेंद्र झांबरे, शेतकरी.

गहू, हरभऱ्यासह ज्वारीच्या बियाणाची मागणी...

रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यामुळे कृषी विभागाच्या वतीने गहू, हरभऱ्यासह ज्वारीचे ५२ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभऱ्याचे ४० हजार ३८० क्विंटल, ज्वारीचे ४० हजार ५२ क्विंटल तर गव्हाचे ७ हजार ७०० क्विंटल बियाणाचा समावेश आहे.

टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीपीकशेतकरीशेतीगहू