फैज्जूला पठाण
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा व वालसावंगी, विझोरा, वाढोणा, मेहगाव, पद्मावती, शेलूद, लेहा, वडोद तांगडा, पोखरी, भोरखेडा, दहीगाव, अडगाव, हिसोडा आदी गावांत यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि रब्बी मका ही पिके जोमात आहेत.
डिसेंबर-जानेवारीतील कडाक्याच्या थंडीमुळे पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. दरम्यान, परिसरात तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
सूर्यफूल, मोहरी, करडई व भुईमूग या पिकांची पेरणी केवळ दोन टक्के क्षेत्रावर झाल्याचे दिसते. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्या शेतातील पिकेही जोमात आली आहे.
सध्या गव्हाचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी कापणीला सुरुवात झाली आहे. हरभऱ्यालाही चांगला फुलोरा येऊन घाट्यांची संख्या वाढली असून, अनेक शेतांत सोंगणी सुरू आहे. रब्बी मकाच्या पिकाने तुरे टाकून कणसे भरली आहेत.
यंदा तांबेरा व घाटेअळी रोगांचा प्रादुर्भाव कमी राहिल्याने फवारणीचा खर्चही आटोक्यात राहिला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात काही प्रमाणात बचत झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यंदा रब्बी पिके पोषक हवामानामुळे चांगली बहरली असली तरी खरा उत्पन्नाचा अंदाज माल घरात आल्यावरच स्पष्ट होतो. सध्या बाजारात पिकांना समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. शासनाने शेतमालाला हमीभाव देऊन कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. - विजय देशमुख, शेतकरी, धावडा.
सध्या पिकांची स्थिती चांगली आहे. दाणे पूर्णपणे भरण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. उष्णता वाढल्यास हलके पाणी द्यावे, जेणेकरून दाणे टपोरे व भरदार होतील. - किशोर महाजन, उपमंडळ कृषी अधिकारी.
रब्बीतील मक्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी
• खरीप हंगामातील मका व सोयाबीन काढल्यानंतर त्वरित पेरणी केलेली गहू-हरभरा पिके कापणीला आली आहेत. उशिरा पेरणी केलेल्या पिकांना अजून काही दिवस शिल्लक आहेत.
• सध्या शेतकरी शेवटच्या पाण्याच्या नियोजनात व्यस्त आहेत. पुढील काही दिवस हवामान स्थिर राहिल्यास यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र, मक्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
Web Summary : Bhokardan's rabi crops like wheat and gram are flourishing due to favorable weather. Farmers are avoiding oilseeds, and maize prices are disappointing. Despite low disease impact, farmers face uncertainty due to market prices. Water management is crucial for optimal yield.
Web Summary : भोकरदन में गेहूं और चना जैसी रबी फसलें अनुकूल मौसम के कारण फल-फूल रही हैं। किसान तिलहन से परहेज कर रहे हैं, और मक्का की कीमतें निराशाजनक हैं। कम रोग प्रभाव के बावजूद, किसानों को बाजार मूल्यों के कारण अनिश्चितता का सामना करना पड़ रहा है। इष्टतम उपज के लिए जल प्रबंधन महत्वपूर्ण है।