Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावामुळे रब्बी हंगाम धोक्यात, सांगा पिकाला पाणी कसे द्यावे? शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:48 IST

एका तासात तब्बल तेरा ते पंधरा वेळेस वीजपुरवठा झाला खंडीत...

गणेश लोंढे

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात विजेचा लपंडाव वाढला आहे. एका तासामध्ये तब्बल तेरा ते पंधरा वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. तुम्हीच सांगा ! आम्ही पिकाला पाणी द्यावे कधी, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

राणी उंचेगाव ३३ के. व्ही. अंतर्गत असलेल्या तळेगाव येथे सकाळी दहा वाजता भारनियमानुसार, शेतामधील वीज आली. शेतकऱ्यांनी विद्युत पंप सुरू केले. दहा वाजून २० मिनिटांनी वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. दहा वाजून २७ मिनिटांनी पुन्हा वीज आली. त्यानंतर तासभर विजेचा लपंडाव सुरूच होता. विजेच्या लपंडावामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात सापडली आहे. राणी उंचेगाव परिसरामध्ये सोयाबीनची काढणी झालेल्या रानात गहू, हरभरा, ज्वारी या पिकाच्या पेरणीची लगबग शेतकरी करीत आहे. परतीचा पाऊस न आल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार विजेच्या वाढलेल्या दाबामुळे लपंडाव होऊ शकतो; परंतु दोन दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू राहील. शेतकयांची होणारी गैरसोय दूर केली जाईल, अशी माहिती राणी उंचेगाव ३३ केव्ही केंद्राचे सहायक अभियंता सोनटक्के यांनी दिली.

शेतकरी पीक पेरणीचे नियोजन करीत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रान ओलावूनच पेरणी करावी लागत आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली आहे. उगवलेल्या कोवळ्या पिकांना वेळेमध्ये पाणी मिळत नसल्यामुळे सुकून जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :वीजशेतकरीशेतीरब्बीजालना