Join us

Pune GBS Virus : चिकन खाल्ल्यामुळे GBS नाहीच! पशुसंवर्धन विभागाचा अहवाल काय सांगतो? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:45 IST

Pune GBS Virus : जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर कुक्कुट पक्ष्यांचा या प्रादुर्भावाशी संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाकडून राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले होते. 

Pune GBS Virus : पुणे शहरात सध्या जीबीएस म्हणजेच गुलियन बरे सिंड्रोम या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून हा रोग चिकन किंवा कोंबड्याच्या माध्यमातून आणि दूषित पाण्यातून पसरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यासाठीच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्रांना भेटी दिल्या असून अहवाल सादर करण्यात आला आहे. 

दरम्यान, जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर कुक्कुट पक्ष्यांचा या प्रादुर्भावाशी संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाकडून राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले होते. 

कसे केले परिक्षण?पशुसंवर्धन विभागाचे पथकाने बाधीत क्षेत्रा लगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरणाच्या आसपासच्या भागातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली. या प्रक्षेत्रामध्ये वेंकटेश्वरा समुहाचे ६ अंडी देण्यासाठी कुक्कुट पक्षी संगोपन करणारे प्रक्षेत्र आणि ५ व्यक्तीगत मांसल कुक्कुट पालन प्रक्षेत्र आहेत.

वेंकटेश्वरा समुहाचे कुक्कुट पालन प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले व त्यापैकी दोन प्रक्षेत्रासाठी पक्ष्यांद्वारे उत्सर्जित मैला प्रक्रिया व्यवस्था आहे. इतर प्रक्षेत्रावर मैला साठवण व्यवस्था आहे. सदर पक्ष्यांचा मैला शेतीसाठी खत म्हणून विक्री करण्यात येतो.

व्यक्तिगत कुक्कुट पालकांच्या ५ प्रक्षेत्रावर गादी पध्दतीने मांसल कुक्कुट पालन करण्यात येत आहे. या प्रक्षेत्रावर साधारणता ४५ दिवसात बॅच विक्रीस तयार होते. पक्षी विक्री नंतर पक्षीघरातील तुस-गादीची विक्री शेतीसाठी खत म्हणून करण्यात येते.

पथकास या प्रक्षेत्रांच्या पासून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या पाण्याच्या स्रोतात मिसळत नसल्याचे आढळून आले आहे. त्या प्रक्षेत्रावरील कुक्कुटपक्ष्यांचे क्लोअॅकल स्वॅब नमुने, कुक्कुट विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित केले आहेत.

सदर संकलित नमुने नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेस परिक्षणासाठी सादर करण्यात आलेत. या संस्थेकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण नमुन्यांपैकी १०६ क्लोअॅकल स्वेंब (८९) व कुक्कुट विष्ठा (१७) तसेच २४ नमुने (९ प्रक्षेत्रा वरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लॉोंकल स्वेंब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जिवाणूसाठी होकारात्मक आलेले आहेत. १ प्रक्षेत्रावरील ५ नमुने नोरोव्हायरस साठी होकारात्मक आलेले आहेत.

नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेने कुक्कुट प्रक्षेत्रावरील २९ पाणी नमुने तपासले असून त्यापैकी २६ पाणी नमुने कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय अस्तित्व नकारार्थी आहे आणि उर्वरित ३ नमुने तपासणी सुरु आहे.

कुक्कुट पक्ष्यांच्या आताड्यांमध्ये कंम्पायलो बॅक्टर जेजूनाय हा सामान्यतः अस्तित्वास असणारा जिवाणू आहे. तसेच हा जिवाणू इतर प्राणी व मानवांत ही आढळतो ही शास्त्रोक्त माहिती आहे. परिक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्रावरील सांडपाणी अथवा विष्ठा नजीकच्या पाणी स्रोतात मिसळले नसल्याने काही दुरचित्र वाहिन्या या आजाराचा कुक्कुट पक्ष्यांपासून पसरत असल्याच्या चुकीच्या बातम्या देत आहेत. यामुळे कुक्कुट पालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे तसेच नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे.

सावधगिरी म्हणून या प्रक्षेत्रानजिकच्या पशुवैद्यकीय संस्थांना या प्रक्षेत्रावर जंतुनाशक फवारणी विशेष मोहिम हाती घेण्याच्या सुचना पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत.

कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहनप्रक्षेत्रावरील जैवसुरक्षा सुनिश्चित करावी, व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचे निर्जंतुकीकरण करावे ही प्रक्रिया नियमित सवयीची करावी. कोणतेही कुक्कुट पक्षी उत्सर्जने पाणवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

नागरिकांना आवाहन जसे पावसाळा ऋतुत कॉलरा सारखे आजार दुषित अन्न पाण्यामुळे होतात तसेच कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय जिवाणू आजारास कारणीभुत ठरू शकतात. कच्चे अर्धवट शिजवलेल्या मासांतून हा जिवाणूचा प्रसार होतो. यासाठी पाणी उकळुन तसेच ब्लीचिंग पावडरची योग्य मात्रेत प्रक्रिया करुनच पिण्यास वापरावे. भाज्या व मांस स्वच्छ करुन व पुर्ण शिजवूनच सेवन करण्यात यावे. हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्यास या जिवाणूचा संसर्ग होत नाही त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नाही असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रपोल्ट्रीशेतकरीपुणे