Join us

शेतकरी सहभागातून धरणातील गाळ उपसा, शेतात गाळ टाकल्याने होतोय फायदा..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 2:08 PM

सद्यस्थितीत अनेक शेतकरी स्वखचनि गाळ आपल्या शेतात नेत आहेत.

रेणापूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे कोरड्या पडलेल्या धरण क्षेत्रात सध्या ६० शेतकरी स्वखर्चाने गाळाचा उपसा करीत आहेत. आजपर्यंत १.६ लाख घनमीटर गाळाचा उपसा केला आहे. पावसाळा सुरू होण्यास आणखी एक दीड महिना आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा होऊन धरणातीलपाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

रेणा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ ६ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. एक महिना पुरेल एवढेच पाणी सध्या धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे रेणापूरकरांसह या धरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील जनतेला येणाऱ्या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

धरणातील पाणीपातळी वाढण्यास मदत

उन्हाच्या तीव्रतेमुळे दररोज १० एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. धरणातील भाग झपाट्याने कोरडा पडत आहे. कोरड्या भागातील गाळाचा उपसा ६० शेतकरी स्वखर्चाने करीत आहेत. डिसेंबर ते १५ एप्रिल या कालावधीत जवळपास १.६ लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यासाठी मोठी यंत्रणा परिश्रम घेत आहे. जेसीबी, पोकलेन व हायवा टिप्परच्या माध्यमातून गाळाचा उपसा सुरू आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत

गाळ काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना जर अनुदान दिले तर गाळाचा अधिक उपसा होईल धरणाची खोली वाढून पावसाचे पाणी धरणात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यास मदत होणार आहे. अनेक शेतकरी गाळ आपल्या शेतात टाकत असून, त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.

सद्यस्थितीत रेणापूर मध्यम प्रकल्प प्रकल्पातून अंदाजे १.६ लाख घनमीटर गाळ उपसा झालेला आहे. यातून ६० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. आजपर्यंतच्या उपशामुळे ०.१६० दलघमी पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्याचबरोबर सध्या रेणा मध्यम प्रकल्पात सहा टक्केच पाणीसाठा आहे. प्रकल्पातील कोरडे पडलेल्या ठिकाणची माती काढण्यासाठी आणखीन शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रेणा प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

पातळी वाढणार...

धरणातील गाळ काढण्यात येत असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यावर प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत अनेक शेतकरी स्वखचनि गाळ आपल्या शेतात नेत आहेत.

टॅग्स :धरणशेतीपाणीपाणीकपात