Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी गावपातळीवर ई-केवायसी विशेष मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 11:46 IST

पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने केंद्र शासनाने दिनांक ६ डिसेंबर, २०२३ ते १५ जानेवारी, २०२४ या कालावधीत गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त कृषी यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व eKYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय अधिकारी/कर्मचारी लाभार्थींची योजनेतील सद्यस्थिती (status) तपासणे व eKYC करणे, पोर्टलवर नोंदणी करतांना जमीनीचा तपशिल भरणे, फेस ऑथेंटिकेशन ॲपचा वापर करून eKYC करणे यासाठी शेतकऱ्यांना मदत करतील. तसेच लाभार्थींची बँक खाती आधार संलग्न केली असल्याची खातरजमा करतील. तसेच गावातील योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थीचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणी अंती पात्र असलेल्या लाभार्थींना पी एम किसान योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करण्यात येईल. तसेच विशेष मोहिमे अंतर्गत योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करावयाच्या पात्र लाभार्थींसाठी विशेष ग्रामसभेंचे आयोजनही करण्यात येईल.

पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी. एम. किसान योजनेच्या या ४५ दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.  

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीआधार कार्डबँक