Join us

राज्यात प्लास्टिक फुलांवर लवकरच येणार बंदी; फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:17 IST

plastic flower ban राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा फलोत्पादन मंत्र्यांनी विधानसभेत केली आहे.

योगेश गुंडकेडगाव : राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा फलोत्पादन मंत्र्यांनी विधानसभेत केली आहे.

अनेक सार्वजनिक कार्यक्रम, मंगल कार्यालय, विवाह समारंभ, मंदिर परिसरात प्लास्टिक फुलांचा वापर वाढला आहे. अशा कृत्रिम फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीवर परिणाम झाला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजा, उत्सव, विवाह, तसेच शुभकार्यासाठी नैसर्गिक फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

फुलांचा ताजेपणा, सुगंध आणि संस्कृतीशी असलेला संबंध हे अद्यापही लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु अलीकडे कृत्रिम फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फुलांकडे दुर्लक्ष होत होते.

यामुळे अनेक वेळा फूल उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत होते. मात्र, शासनाच्या या निर्णयामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कृत्रिम फुलांमुळे शेतकरी संकटातप्लास्टिक फुलांच्या सहज उपलब्धतेमुळे बाजारपेठेत नैसर्गिक फुलांसाठी मागणी घटली होती. अशा कृत्रिम फुलांचा वापर अलीकडे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत, तसेच सण-उत्सवांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला होता. गुलाब, झेंडू, मोगरा, शेवंती यासारख्या फुलांना सणासुदीला मागणी असूनही प्लास्टिक माळांच्या तुलनेत यांना भाव मिळत नव्हता.

नैसर्गिक फुलांचे दर वाढण्याऐवजी स्थिर राहणारप्लास्टिक फुलांच्या बंदीमुळे नैसर्गिक फुलांची मागणी वाढेल; पण उत्पादन व पुरवठा नियमित असल्यास दर वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ग्राहकांनासुद्धा फुलांचा सुगंध परवडणाऱ्या दरात मिळेल, असे विक्रेत्यांचे मत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याकडे आता फूल उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

कोणत्या फुलांची शेती?अहिल्यानगर तालुक्यात झेंडू, मोगरा, गुलाब, शेवंती, अबोली, निशिगंधा याची काही भागातील शेतकरी लागवड करतात. गेल्या काही वर्षापासून फुलांची मागणी घटल्याने लागवडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र फूलशेती वाढण्याची शक्यता आहे.

बंदीचा फायदा इतर व्यावसायिकांनाहीफुलांचे तोरण, माळा, हार तयार करणारे कारागीर, फुलांचे स्टॉलधारक आणि माळकरी यांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पारंपरिक व्यवसायांना गती मिळेल. सोबत घरी बसून हार, गजरे बनवण्यासाठी महिलांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

मागील काही वर्षांपासून आम्हाला झेंडू, मोगऱ्याला भाव मिळत नव्हता. लोक सरळ प्लास्टिकच्या माळा विकत घ्यायचे. त्यामुळे फूलशेतीचा व्यवसाय करणे परवडत नव्हते; परंतु आता शासनाने प्लास्टिकच्या फुलांना बंदी घातल्याने आमच्या नैसर्गिक फुलाला मागणी वाढेल. - वसंत आगरकर, फुलांचे व्यापारी

अधिक वाचा: सामायिक शेतजमिनीची वाटणी करता येते का? काय आहे नियम? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :फुलशेतीफुलंशेतकरीशेतीपीकबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीविधानसभा