Join us

तुती लागवड करा; ३ लाख ९७ हजार अनुदान मिळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 18:09 IST

रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियान

रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत तुती लागवडीसाठी १ लाख ६८ हजार १८६ रुपये, तर कीटक संगोपनगृह बांधकामासाठी १ लाख ७९ हजार, तसेच साहित्यासाठी ३२ हजार रुपये असे तीन वर्षांसाठी एकूण 3 लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदान दिले जाणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत केवळ मजुरीसाठी २ लाख ४४ हजार रुपयाचे अनुदान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड, जोपासना, संवर्धन व कीटक संगोपन करण्यासाठी ६८२ मनुष्य दिवस, तसेच कीटक संगोपनगृह बांधकामासाठी २१३ मनुष्य दिवस मजुरी दर २७३ रुपये, अकुशलसाठी २ लाख ४४ हजार ३३५ रुपये तर कुशलसाठी ३२ हजार रुपये तसेच साहित्य व शेड बांधकामासाठी १ लाख २१ हजार मिळणार आहेत.

महारेशीम अभियान

हिंगोली जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास भरपूर वाव तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग असून, शेतकऱ्यांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती अभियानाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे व्यापक प्रमाणात जनजागृती आणि तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने हे महारेशीम अभियान राबविले जात आहे.

सन २०१७ पासून राबविल्या जाणाऱ्या महारेशीम अभियानाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला, रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यासाठी यावर्षी सुद्धा अभियान आयोजित करण्यात आले आहे. अभियानात प्रशासकीय यंत्रणेसोबतच कृषि क्षेत्रात कार्यरत संस्था, रेशीम लागवडीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

रेशीम कोषांची बंपर आवक, ४८ तासांच्या आत पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाढला विश्वास

व्यापक प्रमाणात जनजागृती

रेशीम शेती म्हणजे काय, या शेतीचे महत्त्व, बाजारपेठेची उपलब्धता, रेशीम उद्योगासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. रेशीम उद्योग करण्यास इच्छुक लाभार्थ्यांची नावेही नोंदणी केली जाणार आहे. तसेच अनुदान आणि तुती लागवड संदर्भात जिल्हा रेशीम विकास कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

रेशीम समग्र-२ योजना

रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, कीटक संगोपन गृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य, तुती लागवड फळबागा, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासून धागा तयार करण्यासाठी मल्टीएंड रिलिंग मशीनसाठी सर्वसाधारण वर्गासाठी ७५ टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीपैसाशेती क्षेत्र