Join us

Pik Vima : सोलापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर आले पिक विम्याचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:05 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२४ मध्ये सांगोला तालुक्यातील एक रुपयात पीक विमा उतरवलेल्या ८६,३६३ पैकी अवघ्या ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत.

सांगोला : मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२४ मध्ये सांगोला तालुक्यातील एक रुपयात पीक विमा उतरवलेल्या ८६,३६३ पैकी अवघ्या ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत सुमारे ५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे.

मात्र उर्वरित ८३,४४९ शेतकरी पीक विम्यापासून अद्यापही वंचितच आहेत. याबाबतची माहिती समजू शकली नाही. मागील वर्षी सांगोला तालुक्यात खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शेती पिकांना फटका बसला होता.

अतिवृष्टी व संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या नियमानुसार त्यावेळी ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती दिली.

त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पडताळणी केली. त्यानंतर सांगोला तालुक्यातील सुमारे ८६,६६३ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा उतरवला होता.

दरम्यान, पीक विमा कंपनीकडून सांगोला तालुक्यातील ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५ कोटी ४७लाख ७३ हजार रुपये पीक विमा अनुदान जमा केले मात्र उर्वरित ८६,६६३ शेतकऱ्यांना पीक विमा अनुदानापासून का वंचित ठेवले, याची चौकशी केली जात आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी सांगोला तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधला असता त्यांच्याकडे मंडलनिहाय यादी अद्याप प्राप्त झाली नसल्यामुळे नेमका पीक विमा कोणत्या मंडळामध्ये जमा होतोय किंवा कोणते शेतकरी पात्र व कोणते शेतकरी अपात्र हे समजून येत नाही.

तत्पूर्वी संबंधित विमा कंपनीकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा अनुदान वितरित केले जात आहे.

सन २०२४ मधील खरीप हंगामात सांगोला तालुक्यातील ८६,६६३ लाभार्थी शेतकऱ्यांनी ५५,१२८ हेक्टर क्षेत्रावर १ रुपयामध्ये पीक विमा उतरवला होता. मागील आठ दिवसांपासून ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये जमा झाले आहेत. - दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी

अधिक वाचा: मान्सून सहा दिवस आधीच येणार; कमी दाबाचा पट्ट्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

टॅग्स :पीक विमापीकशेतकरीसोलापूरशेतीसरकारराज्य सरकारबँक