Join us

Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:57 AM

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख निरंजननाथ यांनी दिली.

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतूनपंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख निरंजननाथ यांनी दिली. योगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची सोमवारी (दि. १८) पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीत सोहळ्यातील सोयीसुविधा, समस्या आदी विविध विषयांवरील चर्चेनंतर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. याप्रसंगी पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, विठ्ठल महाराज वासकर, राणा महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, माउली महाराज जळगावकर, भाऊसाहेब महाराज गोसावी, मारुती महाराज कोकाटे, भाऊ महाराज फुरसुंगीकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर आदींसह दिंडीकरी, फडकरी उपस्थित होते.

प्रथा - परंपरेनुसार रविवार दि. २९ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत-गाजत माउलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल. त्याचदिवशी दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. ३० जून व १ जुलैला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील.

दि २ व ३ जुलैला सासवड, त्यानंतर ४ जुलैला जेजुरी, ५ जुलैला वाल्हे, त्यानंतर नीरा स्नाननंतर ६ जुलैपर्यंत पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी जाईल. त्यानंतर ८ जुलैला तरडगाव, ९ जुलैला फलटण, १० जुलैला बरड, ११ जुलैला नातेपुते, १२ जुलैला माळशिरस, १३ जुलैला वेळापूर मुक्कामी असणार आहे.

१६ जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहोचणार असून मुख्य आषाढी एकादशी सोहळा १७ जुलैला आहे. पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा १७ जुलैला संपन्न होईल.

पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण, पुरंडवडे येथे पहिले गोल रिंगण, खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, वाखरीच्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण, इसबावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी तिसरे उभे रिंगण होईल. ३२ दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा पुन्हा ३० जुलैला आळंदीत परतणार आहे.

टॅग्स :आषाढी एकादशीची वारी 2022संत ज्ञानेश्वरसंत ज्ञानेश्वर पालखीपंढरपूरआळंदीआषाढी एकादशी