Join us
Daily Top 2Weekly Top 5

नकाशावरील पाणंद रस्ते येणार सातबारा उताऱ्यावर; भूमी अभिलेख विभाग राबविणार मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:15 IST

राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून, आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करणार आहे.

राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून, आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे.

सातबारा उताऱ्यावर रस्त्याचा उल्लेख झाल्याने असे रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांना जागा द्यावी लागणार आहे. परिणामी अनेक वर्षापासूनचे पाणंद रस्त्यांसंदर्भातील वाद निकाली लागणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना असे पाणंद रस्ते उपलब्ध झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी या कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही रस्ते असणे आवश्यक असते. अनेक ठिकाणी अशा रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या जाणवते. या पार्श्वभूमीवर शेतरस्ते, पाणंद रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम करण्याकरिता त्यांची मजबुती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

या योजनेला 'मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना' असे नाव देण्यात आले आहे. हे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तसेच प्रत्यक्षात जागेवर उपलब्ध करून देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक शेतरस्ते पाणंद रस्ते नकाशावर उपलब्ध आहेत.

मात्र, सातबारावर त्याचा उल्लेख नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातून पाणंद रस्ते रस्ता काढून देण्यास नकार देतात. प्रशासनाने हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यात न्यायालयीन प्रक्रिया होऊन त्यावर स्थगिती आणली जाते. मात्र, आता भूमी अभिलेख विभाग नकाशावर असलेले रस्ते प्रत्यक्षात सातबारा उताऱ्यावर नोंदविणार आहे.

त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील पाणंद रस्त्याची आखणी शेतकऱ्याच्या संमतीने त्याच्या शेतातून केली जाणार आहे. सातबारा उतारा उल्लेख असल्यास शेतकरीही रस्त्याला विरोध करणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात या रस्त्यांची नोंदणी सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी राज्यभरात मोहीम आखण्यात आली

नकाशावर असलेले रस्ते सातबारा उताऱ्यावर लावण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांत ही मोहीम पूर्ण करण्यात येऊन, महसूल विभागाच्या मदतीने पाणंद रस्ते प्रत्यक्षात जागेवर आखण्यात येतील. - कमलाकर हट्टेकर, उपसंचालक, भूमी अभिलेख विभाग, पुणे.

तीन महिन्यांत काम

• पुढील तीन महिन्यांच्या काळामध्ये हे सर्व रस्ते सातबारा उताऱ्यावर दर्शविण्यात येणार आहेत. त्यानंतर नकाशा व प्रत्यक्ष क्षेत्र यांची पाहणी करून पाणंदरस्ते जागेवर आखण्यात येतील.

• त्यामुळे त्या भागातून जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही मोहीम सबंध राज्यभर राबविण्यात येणार असल्याने येत्या काळात राज्यातील पाणंद रस्त्यांची समस्या दूर होण्याची आशा भूमी अभिलेख विभागाला आहे.

हेही वाचा : कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या सूर्यफुलाची लागवड ठरेल यंदा फायद्याची; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Farm access roads to be on land records in Maharashtra

Web Summary : Maharashtra's land records department will record farm access roads on land records, resolving long-standing disputes. This initiative aims to improve farmers' access to fields and markets by ensuring clear, accessible routes. The process will start in a month.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीग्रामीण विकासग्राम पंचायतसरकार