ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची पंढरी समजले जाणारे आणि संपूर्ण देशभरात आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रसिद्ध असलेले सातारा जिल्ह्याच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात येणार आहे अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. संशोधन केंद्राच्या १७ वर्षांनंतर झालेल्या या ऐतिहासिक भेटीत कृषिमंत्र्यांनी विविध योजनांची घोषणा केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या या संशोधन केंद्रात ‘शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिमंत्री कोकाटे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी व शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार होते. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, संशोधन संस्था प्रमुख, अधिकारी व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
कृषिमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, या केंद्राला ९४ वर्षांचा गौरवशाली इतिहास असून त्याचे बळकटीकरण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी त्यांनी प्रशासकीय इमारत, शेतकरी निवास व प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवास, टिशू कल्चर प्रयोगशाळा, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्षेत्र कार्यालय उभारणीसाठी तत्वतः मान्यता दिली.
पाडेगाव केंद्राने उसाचे ८६०३२, फुले २६५, १५०१२, १५००६, १३००७ यासारखे अनेक दर्जेदार वाण शेतकऱ्यांना दिले आहेत. यापुढे कमी कालावधीत अधिक साखर उतारा देणारे वाण विकसित करावेत, असे त्यांनी सुचवले. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून लागवडीचा खर्च कमी करण्यावर, तसेच उत्पादन व उत्पन्न वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
ऊस पिकात यांत्रिकीकरण वाढवण्यावर भर देताना त्यांनी सांगितले की शासन शेतकरी उत्पादक कंपन्यांना व गटांना ५० टक्के अनुदानावर शुगरकेन हार्वेस्टर उपलब्ध करून देत आहे. तसेच ट्रॅक्टर ऑपरेटेड लहान शुगरकेन हार्वेस्टर विकसित करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी व कृषी विद्यापीठांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
नवीन कृषी धोरणाचा प्रसार गावपातळीवर डिस्प्ले बोर्ड लावून करण्यात येणार आहे, जेणेकरून माहिती थेट शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पिकांची माहिती देणारे अॅप तयार केले जाणार असून त्यातून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन योग्य पिकांची निवड करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याची घोषणा करताना, त्यांनी हवामान बदलांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता न करता शेतीचा उपभोग आनंदाने घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.
सन २०३२ मध्ये या केंद्राला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्याआधी हे केंद्र शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात अभियंता मिलिंद डोके यांनी प्रस्तावित इमारतींचे सादरीकरण केले. केंद्रप्रमुख डॉ. राजेंद्र भिलारे यांनी प्रास्ताविक करताना संशोधन केंद्राच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा मांडला. देशात ऊसाच्या ५६ टक्के आणि महाराष्ट्रात ८७ टक्के क्षेत्र पाडेगावने विकसित केलेल्या वाणाखाली आहे, याची माहिती त्यांनी दिली.
शेतकरी गिरीश बनकर, सौरभ कोकीळ आणि कल्याण काटे यांनी मनोगत व्यक्त करताना, संशोधनाला आर्थिक मदत मिळावी म्हणून व्हीएसआयप्रमाणे दर टनामागे एक रुपया निधी मिळावा, अशी सूचना केली. तसेच ऊस पर्यटन व तरुणांसाठी आकर्षक शेतीचे साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात ऊस संशोधनावर आधारित विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी केले. तर १७ वर्षांनंतर ऊस संशोधन केंद्राला कृषिमंत्र्यांची भेट मिळाल्याने परिसरातील शेतकरी व शास्त्रज्ञ भारावून गेले होते. कृषिमंत्र्यांनी दिवसभर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत करून ऊस बेणे वाटपाच्या कार्यक्रमासाठी पुन्हा आमंत्रण दिले.