इस्माईल जहागिरदार
अलीकडच्या काळात शेतात रासायनिक खतांसह घातक कीटकनाशकांचा अतिवापर होत आहे. परिणामी, उत्पादित होणारे अन्नधान्य हे आरोग्यासाठी पूर्वीसारखे लाभदायक ठरत नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Organic Onions farmer)
ही बाब लक्षात घेऊन वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील एका शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीतकांदा पिकविला असून, एका एकरातून तब्बल ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. विशेष म्हणजे, सेंद्रिय शेतीत पिकविलेल्या या विषमुक्त कांद्याला मोठी मागणी आहे. (Organic Onions farmer)
वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम भागातील शेतकरी सदाशिव वामनराव अडकिणे २०१६ पासून सेंद्रिय शेतीवर भर देतात. प्रामुख्याने सेंद्रिय शेतीत पिकविलेला कांदा (Organic Onions farmer) हा आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे ते सांगतात. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या शेतात त्यांनी एका एकरावर कांदा पिकाची लागवड केली होती.
अडकिणे यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तीन वेळेस सेंद्रिय खताचे डोस दिले. पाच महिन्यांत शेतकऱ्याने एकरात १६ टन विषमुक्त कांद्याचे उत्पादन घेतले. विषमुक्त कांद्याला बाजारात प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. अडकिणे यांनी एका एकरातील कांदा उत्पादनातून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. (Organic Onions farmer)
सेंद्रिय शेतीतील कांद्याला मागणी..
योग्य नियोजन करून सेंद्रिय शेतीत पिकविलेला कांदा हा वर्षभर सडत नाही. शिवाय, कोंब येत नसून, या कांद्याची पापडी जाड असते. हा कांदा वर्षभर टिकून राहतो. तसेच चवीलाही कांदा चांगला असतो. त्यामुळे या कांद्याला अधिक मागणी आहे.
शेतीला कुटुंबाचा हातभार
शेतीस वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे सदाशिव अडकिणे यांची आई, पत्नी, मुले हे सर्व शेती कामास हातभार लावतात. मुले शिक्षण घेत असली तरी सुटीच्या काळात शेती कामे करण्यास मदत करतात. त्यामुळे मजुरांवर होणाऱ्या खर्चाची बचत होते.
कांदा पिकाबरोबर काशीफळ, सीताफळ, पेरू या फळ पिकांनाही सेंद्रिय खत देत विषमुक्त फळांचे उत्पन्न घेतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे गरजेचे आहे.- सदाशिव आडकिणे, प्रगतिशील शेतकरी