Join us
Daily Top 2Weekly Top 5

Organic Farming : "हायब्रीड वाणांत दम नाही, प्रत्येकाच्या ताटात देशी वाणाचं विषमुक्त अन्न असावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 19:53 IST

महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय पुणे येथे सुरू असलेल्या फुले कृषि २०२५ व सावित्री जत्रा या प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी महिला दिनानिमित्त पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना बोलत होत्या.

माती चांगली तर अन्न चांगले आणि अन्न चांगले तर आपले आरोग्य चांगले. माती चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खत व विषारी औषध वापरू नये. या चांगल्या मातीमध्ये देशी बियाणे लावा व आपली पुढची पिढी सुदृढ करा. देशी वाण व मातीचे संवर्धन केले तरच पुढची पिढी आपली निरोगी व सुदृढ राहील. आपण जे चांगले होते ते हरवून बसलो. या चायनीज व हायब्रीड वाणांमध्ये काही दम नाही. ज्यात चमक आहे त्यात धमक नाही. आपल्या भरड धान्यामध्ये खूप ताकद आहे. इथून पुढे आपण भरड धान्य मेळावे भरावा. प्रत्येकाच्या घरात देशी वाणाची परसबाग हवी जेणेकरून आपल्या ताटातील भाजी विषमुक्त असेल असे प्रतिपादन पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय पुणे येथे सुरू असलेल्या फुले कृषी २०२५ व सावित्री जत्रा या प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी महिला दिनानिमित्त पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना बोलत होत्या.

याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महानंद माने, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू आमोलिक, गणेश खिंडचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विष्णू गरांडे, तसेच डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. अविनाश गोसावी, डॉ. सुहास उपाध्ये उपस्थित होते. याप्रसंगी पद्मश्री श्रीमती रहीबाई पोपेरे यांचा सत्कार सौ. विदुला माने आणि सौ. मंदाकिनी पाटील यांनी केला. याप्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते श्रीमती सुभद्रा जयवंत कुरकुटे यांनी लिहिलेले जात्यावरच्या ओव्या या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

पहिल्या काळात कोणत्याही प्रकारचे आजार आम्हाला होत नाहीत मग सध्या या अन्नामुळे नागरिक आजारी का पडत आहेत? संशोधन करून विकसित करण्यात आलेल्या वाणामध्ये दम नाही, त्यामुळे आपण देशी बियाणे लावले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि सेंद्रीय शेतीकडे वळाले पाहिजे असे मत राहीबाई यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे