Join us

मोसंबीच्या घटलेल्या क्षेत्रावर फुलविल्या जाताहेत संत्रीच्या बागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 11:44 IST

आष्टी तालुक्यात मोसंबीच्या बागांमध्ये संत्रीचा घमघमाट

नितीन कांबळे

जास्त पाणी, काबाडकष्ट आणि फळं निघण्यास होत असलेला उशीर त्याचबरोबर चांगल्या दर्जाची असलेली जमीन व लागणारा मोठा खर्च यामुळे मोसंबी पिकात लाभ होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता मोसंबीऐवजी नारंगीला (संत्री) पसंती दिल्याचे कृषी विभागाकडील आकडेवारीवरून समोर येत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी हा दुष्काळी तालुका आहे. इथे शेतीबाडी करताना कायम पाण्याची अडचण असते. मग या कमी पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च करूनदेखील तोटाच सहन करावा लागतो. काही वर्षांपूर्वी तालुक्यात अडीच ते तीन हेक्टर क्षेत्रावर मोसंबीच्या फळबागा होत्या. यात वाढ होताना दिसत नाही.

मोठा खर्च, जास्त पाणी, फळ विक्रीला येण्यासाठी लागणारा आठ महिन्यांचा कालावधी जमिनीचा दर्जा चांगला यामुळे शेतकऱ्यानी मोसंबीच्या फळबागा करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच मोसंबीकडे दुर्लक्ष असल्याने ८०० हेक्टर क्षेत्रावर संत्रीच्या बागा तालुक्यात आहेत. कमी पाणी, कमी खर्च व सहा महिन्यांत फळ विक्रीसाठी येत असल्याने मोसंबी दिसेनाशी झाल्याने नारंगीचा मात्र सर्वत्र फेरा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आष्टी तालुक्यात मोसंबीचे क्षेत्र हे अडीच ते तीन हेक्टर आहे. जास्त पाणी व मेहनत आणि फळ उशिरा येत असल्याने शेतकरी संत्री बागेकडे वळाले असून, आठशे हेक्टर क्षेत्रावर संत्रीबाग आहे. तालुक्यात संत्री लागवडीकडे शेतकरी वळाल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले. कमी पाण्यावर आणि कोणत्याही शेतात संत्रा बाग चांगली येते.

फुलधारणा झाल्यानंतर सहा महिन्यांत फळ मिळत असल्याने झालेला खर्च निघून दहा पाच रुपये रोख स्वरूपात घरात उपयोगी येतात. त्यामुळे संत्री शेती चांगली व परवडणारी असल्याचे कडा येथील संत्रीबागधारक शेतकरी श्याम कर्डिले यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील मोसंबी आणि संत्रा क्षेत्र 

मोसंबी - ३ हेक्टर

संत्रा - ८०० हे.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :फळेशेतीशेतकरीबीडशेती क्षेत्र