Join us

आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:41 IST

Dasta Digital Sign पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत 'ई-सर्च', 'आपले सरकार' या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतींवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे.

पुणे : ई-सर्च, आपले सरकार या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या डिजिटल दस्तांवर आता डिजिटल स्वाक्षरी देण्यात येणार आहे. त्यामुळे असे दस्त प्रमाणित असतील.

नागरिकांना त्याचा वापर सरकारी कामासाठी करता येणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही सुविधा ई प्रमाण या प्रणालीमार्फत उपलब्ध करून दिली आहे.

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यात याचा प्रारंभ होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात सातारा जिल्ह्यापासून होणार आहे. या सुविधेत १९८५ पासूनचे दस्त उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत 'ई-सर्च', 'आपले सरकार' या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतींवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे.

नोंदणी व मुद्रांक विभागाने ही संबंध प्रक्रिया सुलभकरणेसाठी e praman ई-प्रमाण ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत नागरिकांना घरबसल्या एसमएसद्वारे किंवा त्यांच्या लॉगिनमध्ये मिळणार आहे.

असा होईल लाभ◼️ या दस्ताच्या प्रत्येक पानावर संबंधित दुय्यम निबंधकांची डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. 'ग्रीन टिक' किंवा 'डिजिटल टिक'द्वारे दस्ताची सत्यता तपासता येणार आहे.◼️ नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याची गरज नाही; सरकारी सेवा अधिक जलद आणि पारदर्शक असेल. तसेच कार्बन फुटप्रिंट कमी करून पर्यावरणालाही हातभार लागणार आहे.◼️ नागरिकांना एसएमएसद्वारे डाउनलोड लिंक मिळेल. 'डायनॅमिक डिजिटल सिग्नेचर' ही सुविधा सध्या कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधकांकडूनच उपलब्ध होईल.◼️ प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सातारा जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात १९८५ पासूनचे दस्त नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ई-प्रमाणीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये काय?प्रमाणीकरण : दस्त पाठवणारा अधिकृत आहे याची खात्री.एकसंधता : स्वाक्षरीनंतर दस्तामध्ये कोणताही बदल नाही याची खात्री.सुरक्षितता : एन्क्रिप्शन तंत्रज्ञानावर आधारित, व्यवहार पूर्णपणे सुरक्षित.कायदेशीर मान्यता : माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०० अंतर्गत मान्यता.वेग व सुलभता : कागदपत्रे छापणे, स्वाक्षरी करून स्कॅन करणे या त्रासातून मुक्तता; ऑनलाईन त्वरित सुविधा.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावरील ई-सर्व्हिसेसच्या माध्यमातून केलेल्या अर्जावर व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या सर्व अर्जावर दुय्यम निबंधक हे एकत्रितपणे डिजिटल स्वाक्षरी करतील. राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत विभागामार्फत नागरिकांना घरबसल्या आपल्या नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रत मिळणार आहे. - अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे

अधिक वाचा: ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट?

टॅग्स :शेतकरीमहसूल विभागसरकारराज्य सरकारमोबाइलऑनलाइनडिजिटल