Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:49 IST

यापूर्वी शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत सहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली होती. प्रत्यक्षात शेतीतील सुमारे ७० टक्के कामे महिलांकडून केली जातात.

सासवड : शेतीतमहिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतानाही त्यांना मालकी हक्क मिळत नसल्याची वास्तव परिस्थिती बदलण्यासाठी पुरंदर तालुक्यात 'शेत दोघांचे' अभियानाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 'लक्ष्मी मुक्ती' योजनेंतर्गत शेतीच्या सातबारा उताऱ्यावर पतीसोबत पत्नीचेही नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदविण्याच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला सर्वागीण उत्कर्ष मंडळ (मासूम) या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.

पुरंदर तालुक्यात मासूम संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिलांच्या हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यापूर्वी शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत सहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली होती. प्रत्यक्षात शेतीतील सुमारे ७० टक्के कामे महिलांकडून केली जातात.

मात्र, शेतीची मालकी बहुतांश पुरुषांच्या नावावर असते. विसंगतीकडे लक्ष वेधत महिलांना शेतीवर कायदेशीर हक्क मिळावा, शेतकरी म्हणून तिची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, भविष्यातील आर्थिक सुरक्षितता बळकट व्हावी, या उद्देशाने 'शेत दोघांचे' अभियान राबवले जात आहे.

जमिनीच्या मालकी हक्कासाठी ही चळवळ◼️ घराच्या दारावर पत्नीच्या नावाची पाटी लावण्याच्या उपक्रमानंतर आता थेट जमिनीच्या मालकी हक्कासाठी ही चळवळ उभी राहिली आहे.◼️ या मोहिमेला पुरंदर तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३६२ अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी १५० महिलांची नावे सहहिस्सेदार म्हणून सातबाऱ्यावर नोंद झाली आहेत.◼️ उर्वरित अर्जापैकी ५५ अर्जावर बुधवारी (दि. २४ डिसेंबर) तहसील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीसाठी माळशिरस, गुन्होळी, पिंपरी, राजुरी, हरगुडे आदी गावांतील महिला व पुरुष उपस्थित होते.

प्रस्ताव देण्याचे आवाहन◼️ पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी या उपक्रमाची विशेष दखल घेत अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.◼️ मंडलाधिकारी व तलाठ्यांना सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, महिलांनी मोठ्या संख्येने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सामाजिक समतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार◼️ संपूर्ण उपक्रमासाठी मासूम संस्थेच्या साधना महामुनी, वैशाली कुंभारकर, मीना शेंडकर, जयश्री नलगे आणि मोनाली म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.◼️ ही मोहीम संपूर्ण पुरंदर तालुक्यात यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार असल्याचे मासूमच्या मीना शेंडकर यांनी सांगितले.◼️ या उपक्रमामुळे महिलांचा संपत्तीवरील हक्क अधिक ठोसपणे प्रस्थापित होणार असून सामाजिक समतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त होणार आहे. कारण यापूर्वी जमिनीच्या सातबाऱ्यावर केवळ पतीच्या निधनानंतर नाव लागत होते. मात्र आता दोघांना समान अधिकार प्राप्त झाला आहे. कित्येक लोकांनी कर्जबाजारी होऊन जमिनी विकल्या आहेत. शासनाच्या मोहिमेमुळे महिला केवळ कामगार नसून स्वतः मालक म्हणून यापुढे पहायला मिळणार आहेत. - वसुंधरा कुंभारकर, शेतकरी, बनपुरी

अधिक वाचा: आता तलाठ्यांकडचे हेलपाटे वाचणार; ई हक्कद्वारे 'या' ११ प्रकारच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध

टॅग्स :शेतकरीशेतीमहिलामहसूल विभागसरकारपुरंदरराज्य सरकार