पुणे : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात २५० टन गोदाम बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
याच योजनेतून तेलबिया प्रक्रिया युनिटही बांधण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी ३० ऑगस्टची मुदत आहे.
प्रत्यक्ष गोदाम बांधकामाच्या झालेल्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान मिळणार आहे.
काढणीपश्चात पायाभूत सुविधांतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट (१० टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे यासाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के कमाल ९ लाख ९० हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
काढणीपश्चात पायाभूत सुविधा याअंतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट निवडलेल्या लाभार्थ्याने स्वखर्चाने प्रकल्प तयार केला असल्यास प्रकल्पाचे मूल्यांकन, मूल्यमापन व उभारणीनंतर मूल्यांकन करून किंवा निवडलेल्या लाभार्थ्याने राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार लाभास पात्र राहील.
इच्छुक शेतकरी संघ व कंपन्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले.
अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न