नंदुरबार जिल्ह्यातील मिरची व तूर पिकाला जीआय टॅग प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरासह विदेशात निर्यातीसाठी आता मोठा वाव आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हा विकास आराखडा अंतर्गत प्रकल्प आढावा बैठकीत दिल्या.
दरम्यान, जिल्हा विकास आराखड्यातील विविध योजना, उद्योग, पायाभूत सुविधा यावर चर्चा करून सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यासंदर्भातील जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.
नंदुरबार जिल्ह्यातून अनेक कृषी उत्पादने आणि पिके निर्यातक्षम असताना त्यांच्या निर्यातीबाबत आवश्यक ती ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात चांगले उत्पादन असतानाही वस्तू आणि पिकांची निर्यात होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेता आता मिरची आणि तूर या दोन कृषी उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे.
त्यामुळे या दोन्हींची निर्यात कशी वाढेल. देशभरात मार्केटिंग आणि निर्यात याला कशी चालना मिळेल याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित योजनांवर चर्चा करण्यात आली.
निर्यातीसाठी येत होत्या मर्यादा...
• नंदुरबार जिल्ह्यात मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु येथील मिरचीला आवश्यक प्रोत्साहन, मदत मिळत नसल्याने देशभर निर्यातीसाठी अडचणी येत होत्या. आता जीआय टॅग मिळाल्याने त्याचा उपयोग करता येणार आहे.
• अशीच स्थिती तूरडाळीची आहे. नवापूर येथे उत्पादीत होणारी तूरडाळ चांगल्या प्रतिची आहे. स्थानिक व्यापारी ती आपल्या पद्धतीने निर्यातीसाठी प्रयत्न करतात. परंतु त्यांना मर्यादा येतात. आता तूरडाळीलाही जीआय टॅग मिळाला आहे.
• यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल, नाबार्डचे रवी मोरे, मध्यम प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राहुल पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एन. पी. पाटील यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नैसर्गिक शेतीला अधिक प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न
• जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे उत्पादन असलेल्या जीआय टॅग प्राप्त तूर व मिरची निर्यात करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत विशेष भर देण्यात आला.
• यासोबतच कमी क्षमतेचे गोडाऊन उभारणी व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिशा निर्देश देण्यात आले.
• बैठकीत उद्योगासंबंधी अडचणींचा आढावा घेऊन, त्यांचे निराकरण करण्यासाठी वीज व पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच तोरणमाळ येथे रुरल मार्ट उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
• नंदुरबार जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न करण्याचे ठरले. याशिवाय बैठकीत जिल्ह्यातील कृषी क्षेत्र आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगावर चर्चा झाली.
• विविध उत्पादन असलेले उद्योग, लघु उद्योग आणि एमआयडीसींमधील उद्योगांसाठी तयार होणाऱ्या पायाभूत सुविधा यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
• यांसह जिल्हा विकास आराखड्यातील विविध प्रकल्पांवर चर्चा होऊन जिल्हा विकासाला गती देण्यासाठी पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात आला. त्यावर चर्चा करून आवश्यक ती मते नोंदवून घेण्यात आली.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र