Join us

उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे नाफेडने दिले कारण; अध्याप मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:01 IST

Nafed Soyabean Kharedi : नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू होती. दरम्यान, जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून पोर्टल बंद करण्यात आले; मात्र तालुक्यातील ३ हजार ४५० शेतकऱ्यांची खरेदी अद्याप बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

अनंत वानखेडे 

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पाच केंद्रांमध्ये नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू होती. दरम्यान, जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून पोर्टल बंद करण्यात आले; मात्र तालुक्यातील ३ हजार ४५० शेतकऱ्यांची खरेदी अद्याप बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

बाळापूर तालुक्यातील नाफेडच्या पाच केंद्रामध्ये ९ हजार ५७५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी ३ हजार ४५० शेतकऱ्यांची अद्यापही सोयाबीनची खरेदी केलेली नाही. शासनाने ५ जानेवारीपर्यंत सोयाबीन नोंदणीची व १२ जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत दिली होती. त्यानंतर मुदतवाढ दिली नाही व उद्दिष्ट ही वाढवून दिले नाही.

या मुदतीत बारदान्याअभावी खरेदी बंद पडली होती. यावेळी केंद्रामध्ये सोयाबीन विक्रीला आणल्याने शेतकऱ्यांचे वाहनाचे भाडे, आर्थिक व मानसिक नुकसान झाले. आता जिल्ह्यात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत नाफेडने खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

सोयाबीनला बाजारपेठेत भाव नाही. आता शासनाने जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करीत रविवारी नाफेडचे पोर्टल बंद केले. यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढवल्या आहेत. शासनाने विनाविलंब नाफेडच्या खरेदीला मुदतवाढ द्यावी, नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा दाणादाणा खरेदी करावा. - नितीन देशमुख, आमदार, बाळापूर

आमदारांची खरेदी केंद्राला भेट

पोर्टल बंद झाल्याने सोयाबीन खरेदी थांबल्याची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राला भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. शासनाने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दाणादाणा खरेदी करावा, अन्यथा उद्धवसेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शासनाने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी पाहून जिल्ह्याचे नाफेडचे उद्दिष्ट ठरवायला पाहिजे होते. ते न ठरविता मुदतीत बारदान्याचे कारण पुढे करून खरेदी बंद पाडली व आता अचानक खरेदी बंद केल्याने वाहन भाड्याचा भुर्दंड अंगावर पडला आहे. - प्रवीण राऊत, शेतकरी, कारंजा, रमजानपूर

सोयाबीन खरेदी नाफेडमार्फत सुरू असल्याने बाजारपेठेत दरही बरे होते. आता खरेदी बंद आल्याने व्यापारी कवडीमोल भावाने सोयाबीन खरेदी करतील. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. - सुनील घट्टे, शेतकरी, पारस.

या शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजमाप सुरू असताना नाफेडचे पोर्टल बंद

अंदुरा येथील खरेदी केंद्रामध्ये शेतकरी योगेश ठाकरे अंत्री, सारंग इंगळे अंदुरा, जावेद खान, कोकाटे अंत्री, वाडेगाव येथील केंद्रामध्ये शेतकरी अनिल नळकांडे, तुषार भुस्कुटे, नुसरुल्लाखाँ कालेखों, डिगांबर फुरंगे, पारस येथील केंद्रामध्ये शेतकरी मो. आलिम मो. आरीफ, सुनील घट्टे, पुंडलिक घोगरे, मनोहर राऊत, सिंधू बढे, रमेश बढे, सुरेश बढे, दिलीप बढे, वनिता तायडे, अशोक तायडे, ज्ञानेश्वर तायडे, विशाल तावडे आदी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोजमाप सुरू असताना नाफेडचे पोर्टल बंद पडले.

शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, म्हणून नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रावर संदेश आल्यानंतरच सोयाबीन विक्रीला आणले व अचानक कधी बारदाना नाही, तर उद्दिष्ट संपले, म्हणून खरेदी केंद्र बंद पडले. मोजमापासाठी आणलेल्या सोयाबीनच्या वाहतुकीचा भुर्दड शेतकऱ्यांना बसत आहे. - प्रभाकर घोगरे, नांदखेड, टाकळी.

 हेही वाचा : Tomato Farming Success Story : एकरभर फळबागेवर भारी पडले टोमॅटो; वीस गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न घेणारे शिवहार पाटील

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतकरीशेतीअकोलाअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीविदर्भ