Join us

मूग, उडीद करणार मालामाल; आवक घटल्याने बाजार राहणार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:00 AM

काय आहेत भाव?

यंदा अत्यल्प कमी पर्जन्यमान झाल्याने अनेक पिकांचे उत्पादन घटले असून, त्यामुळे अनेक कडधान्य असणाऱ्या पिकांचे भाव गगनाला भिडणार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मूग, उडीद, कुळीद, तूर यासारखे कडधान्य असणाऱ्या पिकांचे उत्पन्न घटल्याने त्याची तेजीत विक्री होण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात मागणीत वाढ

मार्च महिन्यानंतर लग्नसराईमध्ये कडधान्यांना जास्त मागणी असते. उन्हाळा सुरू झाला की अनेक प्रकारच्या डाळींची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते तसेच घरगुती प्रकारचे पापड किंवा इतर साहित्य बनविण्यासाठी उडीद घराघरांतून खरेदी केले जातात. आत्ताच भाव वाढणार असल्याची शक्यता आहे; त्यामुळे मार्च महिन्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढल्यानंतर त्यांचे दर सामान्य माणसांच्या खिशाला परवडणार नाहीत.

कडधान्ये खाणार भाव

यंदा जून महिन्यामध्ये जेमतेम पाऊस झाल्यानंतर सलग दोन महिने पाऊस उघडला होता. विश्रांती घेतलेल्या पावसामळे ऐन सुगीच्या दिवसांत पीक भरण्याच्या वेळेस पिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तूर, उडीद, मूग यांसारखी पिके वर्षातून एकदाच होत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला या पिकांची पेरणी केली जाते. त्यानंतर वर्षभर या पिकांची लागवड केली जात नाही. त्यामुळे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक म्हणून ओळख असणाऱ्या कडधान्यांची यंदा मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवणार असल्यामुळे भाव गगनाला भिडतील, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

यंदा उत्पादन घटणार असल्यामुळे उडीद आणि मूग ही कडधान्ये असणारी पिके भाव खाणार आहेत. उडीद आणि मूग या पिकांचे भाव गगनाला भिडणार असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचा कोणताही फायदा होणार नाही. कारण, शेतकऱ्यांना ही पिके बाजारात विकावी लागतील तेव्हा त्यांचा भाव कमीच असणार आहे. उलट अशा परिस्थितीचा नंतर व्यापायांकडून फायदा उचलला जाण्याची शक्यता आहे.

उत्पादक शेतकरी काय म्हणतात ?

निफाड तालुक्यातील कमी पर्जन्य असलेल्या गावांत कडधान्य पिकांची पेरणी केली जाते, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, महाजनपूर, तळवाडे, निपाणी पिंपळगाव या गावांत काही प्रमाणात पेरणी होते. यंदा मात्र पाऊस अत्यल्प आणि वेळेवर न झाल्याने उत्पन्न घटले आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर होऊ शकतो.-सुवर्णा पवार, कृषी सहायक

जून महिन्यात पेरणी केलेल्या उडीद आणि मुगाला जुलै, ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस न पडल्यामुळे पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे फुले गळून गेली. शेंगा आल्या नाहीत त्यामुळे उत्पन्न घटले. पीक शेतातून काढण्यायोग्यदेखील हातात आले नसल्याने केवळ जनावरांना कोरडा चारा होईल म्हणून काढले. त्यामुळे खर्चसुद्धा निघणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. - संदीप बागल, शेतकरी बागलवाडी

आजचे भाव

उडीद- ९२०० रुपये क्विंटल सरासरी

मूग -९००० रुपये क्विटल सरासरी

तूर- १०,५०० रुपये क्विंटल सरासरी

टॅग्स :शेतकरीबाजारमार्केट यार्डपाऊस