रविराजा तळपू लागल्याने उन्हाची रखरख वाढली आहे. त्यामुळे जलसाठ्यातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या (MGNREGA) सिंचन विहीर (Sinchan Vihir) खोदकामांना वेग येऊ लागला आहे. सध्या लातूर जिल्ह्यात १,६५७ कामे सुरू आहेत.
ग्रामीण भागातील मजुरांना गावातच काम उपलब्ध व्हावे, म्हणून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मजुरांच्या हाताला काम मिळण्याबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी होण्यास मदत झाली आहे.
याशिवाय, गावास पक्के रस्ते, पशुधनासाठी गोठाही होत आहे. सध्या रब्बी हंगाम संपत आल्याने बहुतांश मजुरांना काम मिळत नाही अशावेळी मग्रारोहयो (MGNREGA) आधारवड ठरत आहे.
यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे दुपारीच्या वेळी अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे कुपनलिका, विहिरी आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. बाष्पीभवनामुळेही जलसाठ्यातील तसेच जमिनीतील पाणी कमी होत आहे.
मजूर क्षमतेची कामे...
* मग्रारोहयोअंतर्गत जिल्ह्यात ३ हजार ५६ कामे सुरू आहेत. ही कामे २१ लाख २ हजार ८५४ मजूर क्षमतेची आहेत. सध्या तिथे २ लाख ३ हजार ७२६ मजूर कार्यरत आहेत.
* सर्वाधिक कामे चाकूर तालुक्यात सुरू असून ती ७७८ अशी आहेत. तिथे ५४ हजार २६० मजूर काम करत आहेत. सर्वात कमी कामे रेणापूर तालुक्यात सुरू असून ५ हजार ७२२ मजूर काम करत आहेत.
* जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५०० ग्रामपंचायतीत कामे सुरू आहेत.
रब्बी हंगामातील पिके निघाल्यानंतर मग्रारोहयोच्या कामांना वेग येतो. येत्या काही दिवसांत सिंचन विहिरीची आणखीन कामे वाढतील. सध्या ३ हजार ५६ कामे सुरू आहेत. - संतोष माने, गटविकास अधिकारी, मनरेगा.
मग्रारोहयोअंतर्गत किती कामे सुरु?
कामे | संख्या |
सिंचन विहीर | १६५७ |
बांबू लागवड | ३७ |
घरकुल | ७५५ |
वृक्षलागवड | २१९ |
रस्ता | ११२ |
शेततळे | २७ |
गोठा | २४७ |