Pune : दरवर्षी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून पुण्यात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तर यंदा पुण्यात १० एप्रिल रोजीपासून आंबा महोत्सवाला सुरूवात होत आहे. पुणे शहरातील नागरिकांना थेट शेतकऱ्यांकडून हापूस आंबा विकत घेता यावा आणि खात्रीचा आंबा खायला मिळाला यासाठी कृषी पणन मंडळाने पुढाकार घेत मागील काही वर्षांपासून पुण्यात आंबा महोत्सवाला सुरूवात केली होती.
दरम्यान, यंदा हवामान बदलामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून बाजारात येणार्या देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंब्याची आवक कमी आहे. त्यामुळे सध्या हापूस आंब्याचे दरही जास्त आहेत. पण पणन मंडळाच्या आंबा महोत्सवामुळे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून आंब्याची खरेदी करता येणार आहे. खात्रीचा आणि कोणत्याही मध्यस्थीशिवाय हे आंबे ग्राहकांना स्वस्त दरामध्ये खरेदी करता येणार आहेत. दिवसभर ग्राहकांना हा आंबा खरेदी करता येणार आहे.
यंदा आंब्याचे दर हे ८०० रूपये ते १००० रूपये प्रतिडझन एवढे आहेत. तर मोठ्या आकाराच्या आंब्यासाठी १५०० रूपये प्रतिडझन पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे. अक्षय्य तृतीयेला आंब्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असते. पण त्यावेळी आंब्याचे दर उतरतील की नाही याची शाश्वती नसल्याची माहिती पुणे मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनी दिली.
इराण-अमेरिका युद्धामुळेही आंबा दरावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. आखाती देशांमधील निर्यात बंद असल्यामुळे निर्यात होणारा आंबा देशांतर्गत बाजारपेठांमध्ये विक्री होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले असतानाही दर स्थिर आहेत.
