Join us

नैसर्गिक संकटामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत; बांधावर मिळतोय केवळ ७० रुपये दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 3:24 PM

दुहेरी संकटात आंबा उत्पादक शेतकरी

धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी शिवारात माळरान जमिनीवर लागवड केलेल्या केशर आंबा बागेला एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसला. या काळात फळगळ होऊन आठ टन आंब्याचे नुकसान झाले. शिवाय, उर्वरित आंब्यालाही बांधावर केवळ सत्तर रुपये दर मिळू लागल्याने शेतकऱ्याला मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

गंजेवाडी शिवारात निखिल बाबासाहेब गंजे यांनी अडीच एकर क्षेत्रात चारशे केशर आंबा रोपाची लागवड कोरोना काळात केली होती. आता पाच वर्षानंतर झाडे तयार होऊन याला फळधारणा झाली. यातून चार पैसे उत्पन्न मिळेल, अशी अशा त्यांना होती. मात्र, एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पावसाचा फटका गंजेवाडी गावाला बसला.

वादळी वाऱ्याने अनेकांच्या आंबा बागांचे मोठे नुकसान झाले. यात गंजे यांच्याही बागेतील फळ गळती झाल्याने आठ टन आंबा शेतात पडून आहे. दरम्यान, यातून झाडाला शिल्लक राहिलेल्या दोन टन आंबा फळालाही आता केवळ ७० रुपये प्रतिकिलोचा दर व्यापाऱ्यांकडून मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे यामुळे केशर आंबा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचा पंचनामा महसूल प्रशासनाने केला. परंतु, अद्याप त्याची नुकसानभरपाईही मिळालेली नाही. - निखिल गंजे, आंबा उत्पादक शेतकरी

हेही वाचा - Mango Rejuvenation जुन्या आंबा बागेचं उत्पादन कसं वाढवाल, असे करा व्यवस्थापन

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीमराठवाडाविदर्भ