कोकणची शान आणि बागायतदारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गान घाला घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याला भरघोस मोहोर आला खरा; मात्र फळधारणा होण्यापूर्वीच हा मोहोर काळा पडून जळून खाक होत आहे. डोळ्यांदेखत सोन्यासारखा मोहोर मातीत मिसळताना पाहून बागायतदारांचा कंठ दाटून आला आहे.
'निसर्गाच्या कोपाने तोंडाशी आलेला घास हिरावला' अशी आर्त हाक देत, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेने शनिवारी वेंगुर्ला तहसीलदारांच्या दारात धाव घेतली. निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, तसेच ॲड. प्रकाश बोवलेकर, रवींद्र परब, प्रदीप सावंत, सोमा मुळीक, सदानंद गवस, सद्गुरू मुळीक, विश्राम गोवेकर, संजय मुळीक, रामचंद्र गोवेकर, मोहन आसोलकर, यशवंत सावंत, उत्तम नाईक, प्रमोद सावंत, दिलीप गावडे, महादेव गावडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
वर्ष २०२५ मधील अवकाळी पावसाने झोडपलेल्या कोकम उत्पादकांचे दुःखही अद्याप सरलेले नाही. नुकसानीचे पंचनामे झाले, केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन तीन महिने उलटले, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचा एक रुपयाही जमा झालेला नाही. या दुहेरी संकटामुळे वेंगुर्लातील शेतकरी आता पूर्णपणे खचून गेला आहे.
मोहोराची 'राख' : उत्पन्नावर पाणी!
आंब्याला यंदा विक्रमी मोहोर आला होता; मात्र तो टिकण्याऐवजी काळा पडत आहे. फळधारणा प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची भीती. रसायनांच्या अनेक फवारण्या करूनही निसर्गापुढे बागायतदार हतबल ठरले आहेत.
उधारीच्या विळख्यात बळीराजा अडकला!
औषधे आणि खते उधारीवर घेतल्याने दुकानदारांचे पैसे फेडायचे कसे? हा यक्षप्रश्न. मजुरी आणि मशागतीवर केलेला लाखो रुपांचा खर्च आता अंगावर येत आहे. उत्पन्नाचा मार्ग खुंटल्याने जिल्हा पुन्हा एकदा कर्जबाजारीच्या खाईत लोटला गेला आहे.
कृषी विभागाला 'जाब' विचारला!
मोहोर नेमका कोणत्या रोगामुळे जळतोय? याचे 'संशोधनात्मक' उत्तर विभागाने द्यावे. कृषी सहायकांनी केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी करावी. प्रभावी कीटकनाशकांबाबत बागायतदारांना तातडीने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
'केवायसी'चा घोळ; मदतीचा खोळंबा !
• कोकम नुकसानीचे अनुदान ३ महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा का नाही?
•काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले, तर निम्म्याहून अधिक शेतकरी अजूनही बँकेच्या फेऱ्या मारत आहेत.
• प्रशासकीय दिरंगाईमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.
अस्मानी संकट आणि प्रशासकीय उदासीनता
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कडाक्याची थंडी आणि त्यानंतर अचानक बदललेले ढगाळ वातावरण यामुळे मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बागायतदारांनी पदरमोड करून, उसनवारी करून आणि औषध विक्रेत्यांकडून उधारीवर कीटकनाशके आणून फवारणी केली.
• मात्र, या सर्व फवारण्या निकामी ठरत असून मोहोर जळण्याचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे, या रोगाचे नेमके शास्त्रीय कारण काय? यावर कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही ठोस मार्गदर्शन किंवा संशोधन समोर आलेले नाही. कृषी सहायक बांधावर फिरकत नसल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलनाचे 'रणशिंग : सरकारला इशारा !
जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील.
Web Summary : Mango farmers in Sindhudurg face ruin as blossom withers before fruit. Farmers seek government aid after crop failure and delayed prior compensation. Financial distress deepens due to debt and administrative delays. Farmers threaten protests.
Web Summary : सिंधुदुर्ग में आम के किसान फसल खराब होने से बर्बाद हैं। फल लगने से पहले ही बौर मुरझा गया। किसान फसल विफलता और पहले के मुआवजे में देरी के बाद सरकारी सहायता चाहते हैं। ऋण और प्रशासनिक देरी से वित्तीय संकट गहरा गया है। किसान विरोध प्रदर्शन की धमकी दे रहे हैं।