Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढ्याची मालदांडी थेट लंडनला रवाना; अवघ्या २० किलो ज्वारीसाठी केले १८ हजार रुपये खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:00 IST

Mangalwedha Maldandi Jowar मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीचे महत्त्व अधोरेखित करणारी एक आगळीवेगळी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

मल्लिकार्जुन देशमुखेमंगळवेढा : मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीचे महत्त्व अधोरेखित करणारी एक आगळीवेगळी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

पाटकूल (ता. मोहोळ) येथील शेतकरी कुटुंबातील व शिक्षक असणारे वैभव त्रिंबक गोडाळे यांच्या बहीण सोनाली महेश बोते-जाधव सध्या लंडन येथे वास्तव्यास आहेत.

परदेशात विविध प्रकारची धान्ये सहज उपलब्ध असतानाही त्यांनी खास मंगळवेढ्याचीच मालदांडी ज्वारी मागविली. अवघ्या २० किलो ज्वारीसाठी, ज्याची स्थानिक किंमत सुमारे १ हजार २०० रुपये इतकी आहे.

ती ज्वारी विमानाने लंडनला पाठविण्यासाठी तब्बल १७ हजार रुपयांचा वाहतूक खर्च करण्यात आला. म्हणजेच एकूण खर्च १८ हजार रुपयांपर्यंत गेला.

आरोग्यदायी गुणधर्मांनी समृद्ध असलेली मालदांडी ज्वारी ही आज केवळ शेतीपीक न राहता मंगळवेढ्याची ठळक ओळख बनली आहे.

'ज्वारीचे कोठार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात सुमारे ५०० वर्षांहून अधिक काळापासून मालदांडी ज्वारीची लागवड होत असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात.

परंपरा, काळी कसदार माती आणि अनुकूल हवामान यांच्या संगमामुळे येथील ज्वारीचा दर्जा राज्यातच नव्हे, तर देशभरात सर्वोत्तम मानला जातो.

मालदांडी ज्वारीत प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम तसेच अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असल्याने ती मधुमेह, हृदयविकार व पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरते.

आज मालदांडी ज्वारीपासून पारंपरिक भाकरीबरोबरच थालीपीठ, दलिया, सॅलड तसेच आधुनिक पदार्थ तयार केले जात आहेत. ग्रामीण स्वयंपाक घरातून थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचलेली.

मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी ही परंपरा, आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचे जागतिक प्रतीक बनत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

राष्ट्रपतींनाही मोह आवरला नव्हता!◼️ मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची भुरळ ही आजचीच नाही.◼️ यापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या भारताच्या माजी राष्ट्रपती दिवंगत प्रतिभाताई पाटील यांनाही या ज्वारीचा मोह आवरता आला नव्हता.◼️ पंढरपूर भेटीदरम्यान मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची माहिती व गुणवत्ता समजल्यावर त्यांनी तब्बल ३० किलो ज्वारी आपल्या दौऱ्यावरून सोबत नेली होती.◼️ देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने मंगळवेढ्याच्या ज्वारीची निवड करणे, ही या 'काळ्या मातीतील हिरा'च्या दर्जाची मोठी पावती मानली जाते.

लंडनमध्ये सर्व सुविधा, आधुनिक जीवनशैली आणि जगभरातील विविध धान्ये सहज उपलब्ध आहेत. मात्र, मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची चव, तिची शुद्धता, पोषणमूल्य आणि आरोग्यदायी ताकद कुठेही मिळत नाही. ही ज्वारी पौष्टिक असल्यामुळेच नव्हे, तर पचायला हलकी व आरोग्यास उपयुक्त असल्याने आम्ही आवर्जून मागवतो. - सोनाली महेश बोते, लंडन

अधिक वाचा: Aadhaar Mobile Number Update: आधार कार्डवरील मोबाईल नंबर आता घरबसल्या करता येणार अपडेट; कशी आहे प्रक्रिया?

English
हिंदी सारांश
Web Title : Mangalvedha's Maldaandi Jowar Goes to London; ₹18,000 Spent on 20kg

Web Summary : Mangalvedha's Maldaandi Jowar, known for its health benefits, is gaining international recognition. A family in London spent ₹18,000 to import 20kg of it, highlighting its unique qualities and nutritional value. Even former President Pratibha Patil appreciated its quality.
टॅग्स :ज्वारीपीकशेतीशेतकरीसोलापूरराष्ट्राध्यक्षप्रतिभा देवीसिंग पाटील