अखंड महाराष्ट्रात मकरसंक्रांतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक आणि महिलांच्या दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आलेले आहे.
महाराष्ट्रात मकरसंक्रांत म्हणजे तिळगूळ आणि पतंगबाजी असे समीकरण असले, तरी कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सणाला एक वेगळीच कौटुंबिक आणि धार्मिक जोड आहे.
कोकणची मकरसंक्रांत म्हणजे निसर्ग, शेती आणि परंपरा यांचा एक सुंदर मिलाफ आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात हा सण साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये स्थानिक संस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो.
संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी सकाळी लवकर उठून स्नान करतात. सिंधुदुर्गात या दिवशी 'सुगड' (मातीची लहान मडकी) पूजण्याची प्रथा आहे. या सुगडांमध्ये शेतात आलेले नवीन धान्य जसे की-ओले हरभरे, ऊस, बोरे, गाजर, गव्हाच्या लोंब्या आणि तीळ-गुळ भरले जातात.
देवासमोर या सुगांची पूजा करून ती एकमेकींना 'वाण' म्हणून दिली जातात. सिंधुदुर्गात संक्रांतीच्या दिवशी विशेषतः बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी (ज्यात सर्व शेंगभाज्यांचा समावेश असतो) करण्याची पद्धत आहे.
कोकणी घरात या दिवशी 'तिळाच्या वड्या' किंवा 'तिळगूळ' आवर्जून बनवले जातात. "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असे म्हणत एकमेकांमधील कटुता विसरून नाती जपण्याचा संदेश दिला जातो.
कोकणातील मकर संक्रांत ही केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून ती निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" हा संदेश कोकणी माणूस आपल्या साध्या आणि प्रेमळ स्वभावातून खऱ्या अर्थाने जपतो.
सिंधुदुर्गातील मकर संक्रांत ही केवळ खगोलशास्त्रीय बदलाचा सण नसून, ती मानवी नात्यांमधील ओलावा टिकवून ठेवणारी एक परंपरा आहे. आधुनिक काळात स्वरूप बदलले असले, तरी कोकणी माणसाच्या मनातील श्रद्धा आणि आदरातिथ्य आजही या सणातून स्पष्टपणे जाणवते.
निसर्ग आणि शेतीचा उत्सवकोकण हा कृषिप्रधान भाग असल्याने, संक्रांत म्हणजे नवीन पिकांचे स्वागत करण्याचा सण होय. बागायतीमधील केळी, सुपारी आणि नारळाच्या बागांमध्ये या काळात कामांची लगबग असते. थंडीचा कडाका आणि त्यासोबत येणारा हा सण मनाला उभारी देणारा ठरतो.
किंक्रांत आणि 'धुंदाट'संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला 'किंक्रांत' म्हणतात. सिंधुदुर्गातील काही भागात या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून मांसाहार जेवणाचाही बेत आखला जातो (ज्यांना पाळायचे असते ते पाळतात). तसेच, लहान मुलांच्या आरोग्यासाठी 'बोरन्हाण' घालण्याची परंपराही मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
किंक्रांत : संकटांचा नाशसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला 'किंक्रांत' म्हणतात. पौराणिक कथेनुसार, देवीने या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, कोकणात हा दिवस अशुभ मानला जात असल्याने या दिवशी कोणतेही शुभकार्य किंवा प्रवास टाळला जातो. मात्र, अनेक ठिकाणी या दिवशी विशेष मांसाहार जेवणाचा बेत करून सणाची सांगता केली जाते.
हळदी-कुंकू समारंभ संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतसिंधुदुर्गातील गावागावांत हळदी-कुंकवाचे कार्यक्रम रंगतात. घरोघरी जाऊन सुवासिनी एकमेकींना ओटी भरतात आणि भेटवस्तू देतात. कोकणातील वाडी-वस्त्यांवर हा काळ महिलांसाठी सामाजिक भेटीगाठींचा मोठा उत्सव असतो.
- निकेत पावसकरतळेरे, सिंधुदुर्ग
अधिक वाचा: आता लाईट कनेक्शन मिळणार झटपट; ग्रामीण भागात किती दिवसांत मिळणार नवीन कनेक्शन?