Join us

दुष्काळात तेरावा! पाणीपातळी घटली, 'या' तालक्यात परिस्थिती भीषण; भूजल अहवाल काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 6:16 PM

या जिल्ह्यात सर्वांत जास्त घटली पाणीपातळी

पुणे : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. पण इतर तालुक्यांत पाण्याची भीषण टंचाई असल्याने शेतपीके आणि जनावरांचे हाल होत आहेत. दुष्काळामुळे पिकांचे उत्पादनही कमी झाले आहे. राज्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळामुळे भूजल पातळी घटल्याची माहिती भूजल सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

राज्यात दर तीन ते चार वर्षानंतर छोटामोठा दुष्काळ पडतो. तर साधारण दहा वर्षामध्ये एक किंवा दोन मोठ्या दुष्काळाला शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तोंड द्यावं लागतं. दुष्काळामुळे भूजल पातळीत घट होत असते. यंदा राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २७ तालुक्यांमध्ये भूजल पातळी कमालीची कमी झाली असून उर्वरित ३२६ तालुक्यांमध्ये भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत साधारण असल्याचं भूजल सर्वेक्षणाच्या मार्च महिन्याच्या अहवालातून समोर आले आहे. 

भूजल सर्वेक्षणकडून प्रत्येक वर्षामध्ये चार वेळा भूजल पातळीचे अहवाल प्रसिद्ध केले जातात. त्यातील मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार भूजल दुष्काळ निर्देशांकानुसार राज्यातील २ तालुक्यांत मध्यम तर २५ तालुक्यांत सौम्य निर्देशांक दर्शवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सौम्य निर्देशांक असलेल्या २५ तालुक्यांपैकी सर्वाधिक १० तालुके हे नाशिक जिल्ह्यातील असून येथीलच १ तालुका मध्यम निर्देशांकामध्ये येतो. त्यामुळे नाशिकमधील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांची भूजल पातळी खालावलेली आहे. 

'या' तालुक्याची भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक घटलीराज्यातील अनेक जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये मागच्या दहा वर्षाच्या भूजल पातळी सरासरीपेक्षा यंदा भूजल पातळी खालावलेली आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील भुजलात सर्वाधिक घट झाली असून पातळी १३.६१ मीटरपर्यंत गेली आहे. तर मागच्या दहा वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत ही घट ४.१४ मीटरने असल्याचं समोर आलं आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक भूजल घट असून या पाणलोट क्षेत्रातील मागच्या १० वर्षातील निच्चांकी भूजलपातळी ही १४.२२ मीटर एवढी होती. 

'या' जिल्ह्यांत सर्वांत कमी भूजलपातळीराज्यातील सर्वांत कमी भूजलपातळी ही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असून येथे तब्बल २५.९५ मीटर एवढी पातळी असून त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील भूजल पातळी २४.२० एवढी आहे. तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात २३.२८ भूजल पातळी असून पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यामध्येसुद्धा भूजल पातळी कमी आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सर्वांत जास्त पाऊस पडत असूनही येथील मागच्या दहा वर्षातील सरासरी भूजलपातळी ही १४.२१ मीटर असून यंदाची भूजल पातळी ही १४.७३ एवढी आहे.सर्वांत कमी भूजल पातळी असलेले तालुकेतालुका - मागच्या १० वर्षातील सरासरी भूजल पातळी - यंदाची भूजल पातळी

  • तेल्हारा (अकोला) - २३.७३ - २३.२८
  • अचलपूर (अमरावती) - २५.४२ - २४.२०
  • नांदुरा (बुलढाणा) - १६.५५  - १४.०८
  • अंजनगाव सुर्ज (अमरावती) - १५.४८ - १४.५०
  • यावल (जळगाव) - २३.९३ - २५.९५
  • रावेर (जळगाव) - १८.६७ - १७.१०
  • जळगाव - १५.५७ - १५.४९
  • महाबळेश्वर (सातारा) - १४.२१ - १४.७३
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपाणीदुष्काळ