Join us

Mahadbt Drone Anudan Yojana : शेतकऱ्यांनो ड्रोनसाठी अर्ज करा; ४ लाख अनुदान मिळवा! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:06 IST

Mahadbt Drone Anudan Yojana : शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकते.

Mahadbt Drone Anudan Yojana : कृषी क्षेत्रात मानवविरहित वायू यान अर्थात ड्रोनच्या वापरास मोठ्या प्रमाणात संधी आहे. कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, खते फवारणी या बाबींव्यतिरिक्त कृषिक्षेत्राशी निगडित इतर कामांसाठीदेखील ड्रोनचा वापर करता येऊ शकतो, ड्रोनसाठी ४ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.

ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला.

शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. सन २०२४-२५ साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत १०० ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ड्रोनसाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करावा लागणार आहे.

कोणाला मिळेल अनुदान?

• शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था यांना ४० टक्के म्हणजे ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी व तत्सम पदवीधर यांना ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये अनुदान दिले जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये, तर सर्वसाधारण शेतकरी यांना ४० टक्के म्हणजेच ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

• किसान ड्रोन व त्याचे संलग्न जोडणी साहित्याची मूळ, वास्तविक किंमत असेल त्यापैकी जे कमी असेल ते अनुदान रक्कम देय राहील. ड्रोनसाठी ऑफलाइन अर्ज न करता इतर अवजारांप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याबाबतची सूचना कृषी आयुक्तांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचा वेळ, पैसा वाचणार

पिकांवर रोग आल्यास किंवा रोग होऊ नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. फवारणी करण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते. यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा व वेळही खर्च होतो. शिवाय तीव्र स्वरूपाच्या औषधींमुळे जीविताचा धोका उ‌द्भवू शकतो; परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ड्रोनमुळे फवारणी करणे सोपे झाले आहे. ड्रोनची तांत्रिक माहिती घेऊन शेतकरी स्वतः फवारणी करू शकतील किंवा तज्ज्ञ ड्रोन प्रशिक्षण चालकांकडून फवारणी करवून घेऊ शकतील.

महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज

कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ड्रोन हा घटक ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजनासरकारी योजना