Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरीपात नुकसान, रब्बीत महागाई! शेतकऱ्यांना बसतोय दुहेरी फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:42 IST

खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर आता रब्बी हंगामात बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमतींचा आणखी फटका बसला आहे. बाजारात हरभरा, गहू विकताना मिळणारा कमी दर आणि बियाण्यासाठी दुप्पट मोजावी लागणारी किंमत यामुळे शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटात सापडले आहेत.

खरीप हंगामातील अतिवृष्टी, कीडरोग आणि नैसर्गिक आपत्तीचा फटका अद्याप सावरण्याआधीच रब्बी हंगामात बियाणे व खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. 

सध्या हरभरा आणि गहू बाजारात अतिशय कमी दराने विकले जात आहे; पण त्याच पिकांसाठी बियाण्यांच्या किमती तब्बल दुप्पट आकारल्या जात आहेत. त्यामुळे बाळापूर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः संकटात सापडले आहेत.

बियाणे दर आकाशाला

शेतकरी आपला हरभरा फक्त ४५ ते ५० रुपये किलो दराने विकत आहेत. पण, रब्बीसाठी त्याच हरभऱ्याचे बियाणे कृषी केंद्रात १०० रुपये किलोने विकले जात आहे. तसेच, बाजारात गहू २० रुपये किलो दराने विक्री होत असताना बियाण्यासाठी शेतकऱ्यांना १०० रुपये किलो भरावे लागत आहेत.

शेतमालाचे दर निम्मे, बियाण्यांचे दर दुप्पट अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

उत्पादन खर्च वाढला, पण भाव मात्र घसरले

शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. यात मजुरी, मशागत, कीटकनाशके, रासायनिक खते, डिझेल, पंपिंग खर्च या सर्वांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता बियाण्यांच्या महागाईने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. उत्पादनाचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, यामुळे शेतकरी खरेच अडचणीत सापडले आहेत.

खरीप हंगामच उद्ध्वस्त

खरीप काळात अतिवृष्टी, ओलसर हवामान आणि कीडरोगांमुळे सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सोयाबीनमध्ये यलो मोझॅक आणि इतर रोगराई

काही शेतकऱ्यांनी पिकावरच ट्रॅक्टर फिरवून पिके नष्ट केली

काहींनी पिके जनावरांना सोडली

कापसात लाल्या रोगामुळे पाने पिवळी–लाल होत आहेत

यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या तळाला पोहोचले आहेत.

रब्बी हंगाम सुरू… पण महागाई अडथळा

ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे ते शेतकरी रब्बी पिकांच्या तयारीला लागले आहेत.

गव्हाचे बियाणे १०० रुपये किलो

हरभऱ्याचे बियाणे १०० रुपये किलो

खतांचेही वाढलेले दर

यामुळे नवीन हंगामाची सुरुवात करतानाच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

आम्ही कशी शेती करायची?

कमी दरात शेतमाल विकून दुप्पट दरात बियाणे खरेदी करावे लागणे ही अन्यायकारक परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सरकारने

बियाणे–खत दर नियंत्रण

हमीभाव

अनुदान

नुकसान भरपाई

यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

संपूर्णतः, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणखी खोल होत असून आगामी हंगामात हे संकट किती वाढेल याची चिंता सर्वत्र व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : New Soybean Variety : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या खरीपात बाजारात येणार सोयाबीनचे नवे वाण वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Falling crop prices, soaring seed costs: Farmers face deeper crisis.

Web Summary : Farmers in Balapur face a double whammy: crop prices halved, seed costs doubled. Already reeling from kharif losses due to excessive rain and pests, rising input costs deepen their financial woes, making farming increasingly unsustainable.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनगहूमकाबाजारशेतकरीहरभरा