Pune : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेंतर्गत यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत जवळपास ११ कोटी रूपयांचे कर्ज वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील शेतमाल काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारात दर मिळत नसल्यास आणि साठवणुकीची अडचण येत असल्यास पणन मंडळाने राज्यातील बाजार समित्यांमध्ये गोदामांची उभारणी करून शेतकऱ्यांना माल साठवणुकीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
दरम्यान, मागच्या म्हणजेच २०२३-२४ या हंगामात पणन मंडळाच्या या योजनेतून ३६ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यामध्ये ६८ बाजार समित्या आणि २ हजार ८२१ शेतकरी सहभागी झाले होते. त्याबरोबरच २ लाख ८३ हजार ५५ क्विंटल माल तारण ठेवण्यात आला होता. त्याबरोबरच ४ कोटी ६० लाख रूपये पणन मंडळाकडून बाजार समित्यांना कर्ज वाटण्यासाठी देण्यात आले होते.
त्याबरोबरच यंदाच्या हंगामात म्हणजे २०२४-२५ मध्ये राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांमधील १४४ बाजार समित्या शेतमाल तारण कर्ज देण्यासाठी इच्छुक आहेत. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत म्हणजेच २ जानेवारी २०२५ पर्यंत ३४ बाजार समित्यांनी १ लाख १६ हजार ३०८ क्विंटल शेतमाल तारण ठेवला असून त्या बदल्यात १० कोटी ६३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे एकूण १७९ गोदामे असून यामध्ये शेतमाल साठवला जाऊ शकतो. त्याबरोबरच १ लाख ६५ हजार मेट्रीक टन शेतमाल साठवणुकीची क्षमता असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यंदा शेतमाल तारण कर्ज कमी का?
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात शेतमाल तारण कर्जाचे प्रमाण कमी आहे. कारण सरकारने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून याद्वारे मालाची खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांना यामुळे माल साठवण्याची वेळ आली नसल्याने यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी शेतमाल तारण कर्ज घेतले आहे.