पुणे : जुन्नर तालुक्यातील बरीच गावे बिबट्याच्या हल्ल्यांनी त्रस्त झाली आहेत. याच तालुक्यातील माणिकडोह गावात राज्यातील एकमेव बिबट निवारा केंद्र आहे. मात्र, या केंद्राचा इथल्या बिबट्या पीडित गावांना तसा थेट फायदा काहीच नाही. गावकऱ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले बिबटे, निराधार पिले यांच्यासाठी हे केंद्र आहे. हल्ला करणारे बिबटे पकडले जातात, मात्र ते इथे कायम स्वरूपात ठेवले जात नाहीत. त्यांच्यासाठी वेगळे पिंजरे असून तिथे त्यांच्यावर उपचार केले जातात व ते पुन्हा जंगलात राहण्याक्षम झाले की सोडून दिले जातात. त्यावर गावकऱ्यांचा आक्षेप आहे पण केंद्रात सक्षम बिबटे ठेवले जात नाहीत यामुळे वनविभाग ते ठेवत नाहीत.
सुमारे १० एकर जागेवर हे केंद्र आहे. २००३ मध्ये त्याची स्थापना झाली. वैद्यकीय उपचार करण्यासाठी आधुनिक साधनांनी सुसज्ज रुग्णालय, ऑपरेशन थिएटर व बिबट्यांना नैसर्गिक अधिवासाचा भास देणारे मोठमोठे पिंजरे यात आहेत.
४५ बिबटे सध्या तिथे आहेत. पिले असतानाच आणून ठेवलेल्या बिबट्यांपासून ते पकडताना जखमी झालेल्या बिबट्यांपर्यतचे अनेक बिबटे त्यात आहेत. त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी सुरेख नावे ठेवली आहेत. त्यांना नियमितपणे त्यांचे खाद्य दिले जाते. त्यासाठी वनविभागाचे स्वतंत्र कर्मचारी आहेत. वैद्यकीय सुविधांसाठी दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती आहे. त्यांचे स्वतंत्र कर्मचारी आहेत.
माणिकडोहमध्येच नवे केंद्र साकारतेय
याच केंद्राच्या शेजारी आणखी एक निवारा केंद्र बांधले जात आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. निवारा केंद्रात दाखल बिबट्यांचा अखेरपर्यंत सांभाळ केला जातो. पकडलेले व उपचारानंतर बरे होणाऱ्या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच जंगलात पुन्हा सोडण्याचा निर्णय त्यावर आक्षेप घेतले जात असल्याने सध्या स्थगित आहे. त्यामुळे आता नव्याने बांधले जाणारे केंद्र लगेचच उपयोगात येऊ शकेल असे वनविभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्रांचे व्यवस्थापन वनविभागाकडेच आहे.
