Join us

कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेतलेल्या लिंबाच्या कलमांना लिंबूऐवजी लागले ईडीलिंबू; शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:27 IST

केव्हीके, करडा येथून घेतलेल्या लिंबाच्या कलमांची शेतात लागवड केली. मात्र, झाडांना अपेक्षित लिंबू न लागता ईडीलिंबू लागल्याचे आढळून आले आहे.

वाशिम जिल्ह्याच्या केव्हीके, करडा येथून घेतलेल्या लिंबाच्या कलमांची शेतात लागवड केली. मात्र, झाडांना अपेक्षित लिंबू न लागता ईडीलिंबू लागल्याचे आढळून आले आहे.

या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करत कुपटा येथील शेतकरी विजय नीलकंठ देशमुख यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार, मानोरा यांना १५ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले आहे.

शेतकरी देशमुख यांनी सांगितले की, हट्टी शेतशिवारातील दोन एकर जमिनीवर केव्हीके करडा, (ता. रिसोड, जि. वाशिम) यांच्याकडून २४ जून २०२० रोजी साई सरबती (कागदी) लिंबाच्या कलमांची लागवड केली.

झाडांना यावर्षी फळे लागल्यानंतर संशय निर्माण झाला. संशयास्पद फळे डॉ. योगेश इंगळे (पीकेव्ही अकोला), प्रा. निवृत्ती पाटील (केव्हीके करडा), संतोष वाळके (उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम) यांना कृषी विभागाच्या जाहीर कार्यक्रमात १३ डिसेंबर २०२४ रोजी दाखवली.

त्यांनी तपासणी करून ती ईडी लिंबाचीच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर १४ डिसेंबर २०२४ रोजी शेतकरी देशमुख यांनी केव्हीके करडाचे फील्ड मॅनेजर प्रमोद देशमुख आणि समन्वयक यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार, २४ डिसेंबर रोजी प्रा. निवृत्ती पाटील आणि प्रमोद देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्येही ईडीलिंबू असल्याचे निष्पन्न झाले.

६ लाखांचा खर्च गेला व्यर्थ

• लिंबूची झाडे लागवडीपासून आजपर्यंत खते, फवारणी आणि इतर खर्च मिळून ५ ते ६ लाख रुपये खर्च झाले.

• झाडांना काटे असल्यामुळे दुसरे पीक घेता आले नाही, त्यामुळे दुहेरी नुकसान झाले. झाडांनी यावर्षीपासून उत्पादन द्यायला सुरुवात केली असती आणि पुढील २०-२५ वर्षे उत्पन्न मिळाले असते.

• त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचे शेतकरी देशमुख यांचे म्हणणे आहे.

शेतकरी विजय देशमुख यांच्या शेतात लिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. मात्र त्या झाडांना ईडीलिंबू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. - गणेश जैताडे, मंडळ कृषी अधिकारी, मानोरा जि. वाशिम.

हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीवाशिमफलोत्पादनधोकेबाजी