Join us

अकोले तालुक्यातील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 11:01 IST

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करणार आहे. मध केंद्र योजनेंतर्गत येथे जनजागृती मेळावा घेण्यात आला.

तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात निसर्गाचा मोठा ठेवा आहे. येथील करवंदाच्या जाळ्या, गावठी आंब्याची झाडे, तसेच इतर फळझाडे आणि काही वेली बहरल्या आहेत. यामुळे या परिसरात सध्या मधमाश्यांचे प्रमाणही अधिक आहे. मध संकलनाच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा आशावाद बाळगत खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने लव्हाळवाडी येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास सुमारे शंभराहून अधिक पुरुष व महिला उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हा केंद्रचालक राजू कानवडे व तुकाराम धुमाळ यांनी मधममाशा पालन, मध संकलन व त्याची विक्री या उद्योगाविषयी महत्त्व पटवून देऊन त्यांचे मध उद्योगाविषयीचे अनुभव विशद केले. वसंत चौधरी यांनी मधमाशा पालन व मध केंद्र योजनेविषयी विस्तृत माहिती दिली.

आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास अध्यक्ष म्हणून सरपंच रावजी मधे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाळे, बाबासाहेब ठोसर, पत्रकार संजय महानोर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंढे, बाळासाहेब ठोसर, मध पर्यवेक्षक वसंत चौधरी, पर्यवेक्षक शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते. वसंत चौधरी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर रमेश शेळके यांनी आभार मानले.

अधिक वाचा: मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

ग्रामस्थांना आत्मविश्वासमिळालेल्या प्रेरणेतून आपणही हा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो, असा आत्मविश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केल्यामुळे भविष्यात लव्हाळवाडी हे गाव मधाचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू शकेल.

टॅग्स :शेतकरीशेतीआंबापीकखादीराज्य सरकार