Join us

World Bee Day : कीटकनाशकांच्या अतिरेकामुळे मधमाशी बांधापासून दुरावली, हे खरंय का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:25 IST

World Bee Day : मधमाशीच्या रूपाने निसर्गाने जीवसृष्टीला सर्वोत्तम असे 'गिफ्ट' दिले आहे.

नाशिक : आधुनिक शेतीच्या नावाखाली रासायनिक खतांचा (Rasayanik Khate) अतिवापर व कीटकनाशकांच्या वारेमाप फवारणीमुळे दिवसेंदिवस मधमाशी शेतीच्या बांधापासून दुरावत चालली असून, शेतीपिकांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. फळधारणेसाठी आवश्यक असलेली परागीभवनाची अत्यंत महत्त्वाची व अत्यावश्यक प्रक्रिया पार पाडण्यामध्ये मधमाशी (Madhmashi) ही मोलाची भूमिका बजावते. 

'मधमाश्यांनो परत फिरा रे...' असे म्हणण्याची वेळ जवळ आली असून, मधमाशांचे (Honey Bee) संवर्धन काळाची गरज आहे. दरवर्षी २० मे रोजी मधमाशी दिन साजरा केला जातो. मधमाशी हा पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मधमाशीच्या रूपाने निसर्गाने जीवसृष्टीला सर्वोत्तम असे 'गिफ्ट' दिले आहे. या अमूल्य वरदानाचे संरक्षण करणे मानवाच्या हातात आहे.

८७ पिकांचे परागीभवनमधमाश्यांसह विविध पक्षी आणि वटवाघुळ मिळून जगातील ३५ टक्के शेतमालाचे परागीकरण करत असतात. मधमाश्यांमुळे ८७ प्रकारच्या पिकांचे परागीभवन होते, असे तज्ज्ञ सांगतात. ज्यामुळे मनुष्याला अन्नधान्य उपलब्ध होते. मानवी आहारातील दर चार पिकांपैकी तीन पिकांना परागीकरणाची गरज असते.

दिवस-रात्र काम करणारा कीटकमधमाशी हा दिवस-रात्र काम करणारा कीटक आहे. मानवी आरोग्यासाठी बहुगणी मध हे मधमाश्यांमुळे मिळते. त्यामुळे मधाचा वेगवेगळ्याप्रकारे आरोग्यासाठी उपयोग केला जातो. मधात अलेल्या फॅक्टोज आणि ग्लुकोजमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत हाते. केवळ ५०० ग्रॅम मथ तयार करण्यासाठी मधमाश्यांना वीस लाखांपेक्षा जास्त फुलांमधून मकरंद व पराग गोळा करावे लागते, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

मधमाश्यांना निर्माण झालेले धोकेमधुमक्षिका पालनाबाबत अद्यापही शेतकरीवर्गात फारशी जागरूकता आलेली नाही. याउलट बांधालगत असलेल्या मधमाश्यांचे पोळे जाळून त्यांचे आश्रयस्थान नष्ट केले जाते. यापूर्वी शेताच्या बांधावर तसेच आजूबाजूला सहजरीत्या नजरेस पडणारे मधमाश्यांचे पोळे आता दुरापास्त झाले आहे.

काही ठिकाणांचा अपवाद सोडला तर मधमाश्यांचे पोळे बांधालगत नजरेस पडत नाही. परिसरातील मधमाश्या नष्ट झाल्या तर त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, हे वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे. मधासाठी पोळे जाळणे, कीटकनाशकांची वारेमाप फवारणी, मोबाइल टॉवरची वाढती संख्या, मधमाश्यांबाबत अज्ञानातून पसरलेले गैरसमज व भीती अशा विविध कारणांमुळे मधमाशीचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे. 

शेतीसाठी वरदानमधमाश्या एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे स्थलांतर करताना सोबत परागकणदेखील घेऊन जातात. परागकणांचे हे मुख्य वाहक असून, यामुळे फुलांची बीजधारणा व फळधारणा होण्यास मोठी मदत होते. या प्रक्रियेलाच 'परागीभवन' असे म्हणतात. परागीभवनामुळे पीक उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे मधमाश्या शेतीसाठी वरदान आहेत. मधमाशी हा समूहाने राहणारा कीटक असून, त्याचे पोळे ज्याठिकाणी असते त्यासभोवतालचे वातावरण हे शुद्ध स्वरूपाचे असते. फुलांमधील मकरंद आणि पराग शोषणाद्वारे मधमाश्या या आपली भूक भागवतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकृषी योजना