Join us

जागतिक केळी दिन : 150 वर्षे झाली, केळी अजूनही फळ नाही! नेमकं कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:18 IST

आज जागतिक केळी दिवस असून 'याला फळ म्हणावे की नाही', असा प्रश्न आजही कायम आहे.

जळगाव : केळी म्हटलं आजही अनेकांचं आवडत फळ म्हणून ओळखलं जाते. या केळीचे अनेक फायदेही असल्याने लहान मुलांसह तरुण, जेष्ठ नागरिकही मोठ्या आवडीने केळी खातात. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. आज जागतिक केळी दिवस असून 'याला फळ म्हणावे की नाही', असा प्रश्न आजही कायम आहे. कारण अजूनही सरकारच्या फळांच्या यादीत केळीचा समावेश नसल्याचे वास्तव आहे. 

केळी हे महत्वाचे पीक असून दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी जागतिक केळी दिवस साजरा केला जातो. शिवाय केळी हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते. देशभरातच नव्हे तर केळी जगभरात विविध प्रकारांत आढळून येते. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते.  जळगाव जिल्ह्यातील केळीचा इतिहास गेला तर रावेर तालुक्यातील कोचूर शिवारात १८४४ ते १८५०च्या दरम्यान पहिल्यांदा केळी लागवड झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार जिल्ह्यात केळी सुमारे दीडशे वर्षांची झाली, तरी फळ की आणखी काय हा प्रश्न कायम आहे. फळाचा दर्जा नसल्याने केळी उत्पादकांना बऱ्याच योजनांचा फायदा मिळत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या वर्षी शासनाने फळाचा दर्जा देण्याची नुसतीच घोषणा केली होती.

दर्जा मिळाल्यानंतर काय?

निर्यातीसाठी शासनातर्फे तत्काळ सोयी-सुविधा पुरविण्यात येतील. नैसर्गिक नुकसान झाले तर तत्काळ मोबदला मिळू शकतो. उती संवर्धित रोपांसाठीही अनुदान. देखभालीसाठी खर्च मिळू शकतो. त्यामुळे अजून किती काळ राजमान्यता मिळण्यास वाट पाहावी लागणार, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे.

निकषानुसार फळझाडाची एकदा लागवड केली की, ते झाड दीर्घकाळ फळ देते. या उलट केळीच्या झाडाचे आयुष्य सुमारे दीड ते दोन वर्षाचे. त्यामुळे अन्य फळ पिकांच्या तुलनेत केळीच्या पिकाला नैसर्गिक आपत्तीमध्ये समाधानकारक नुकसान भरपाई मिळत नाही. 

- वसंत महाजन, केळी उत्पादक

टॅग्स :शेतीजळगावकेळीमार्केट यार्ड