- संतोष थोरात
अहिल्यानगर : ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्दा परिसरात सध्या ज्वारीकाढणीला वेग आला आहे. मात्र, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि बाजारभावातील अनिश्चितता, यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. ज्वारी काढणीसाठी मराठवाड्यातून मजूर आणावे लागत आहेत.
खर्डा व परिसरात ज्वारी हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. यंदा मध्यंतरी पसरलेल्या दाट धुक्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. चिकटा, मावा यांसारख्या रोगांसह रानडुकरांचा त्रास आणि विजेचा लपंडाव यामुळे पिकाला फटका बसला. तरीही, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पीक सावरले असून, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, उत्पादन खर्च आणि बाजारभावातील मोठी तफावत चिंतेचा विषय ठरली आहे.
सध्या महिला मजुरांना ४०० ते ५०० रुपये, तर पुरुष मजुरांना ५०० ते ६०० रुपये रोजंदारी द्यावी लागत आहे. वाढत्या मजुरीदरामुळे काही ठिकाणी परस्पर सहकार्याच्या 'सावड' पद्धतीने ज्वारी काढणीचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक ठिकाणी मजुरांची कमतरता असल्याने मराठवाडा भागातून मजूर आणावे लागत असून, वाहनभाडे व आगाऊ रकमेचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. ज्वारी काढणी, मोडणी, खुरपणी, मशागत, औषध फवारणी, कडबा बांधणी व वाहतूक यांसह विविध कामांवर एकरी मोठा खर्च होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जूट, माळदांडी, बेदरी ज्वारी
खर्डा परिसरात जूट ज्वारी, माळदांडी, बेदरी आदी जातींची लागवड होते. ज्वारी तसेच त्यापासून निघणारा कडबा जनावरांसाठी पौष्टिक व दर्जेदार असल्याने बाजारात मागणी असते. मात्र, काही भागात पाण्याच्या अतिरेकामुळे ज्वारी काळी पडण्याची समस्या निर्माण झाली आहे.
मजुरी आणि खतांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेती परवडत नाही. तरीही, कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. बैल पाळणे परवडत नसल्याने ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. त्यामुळे शेतीचा उत्पन्न खर्च वाढला आहे.
- रामदास घुगे, नागोबाचीवाडी
